नागपूर शहराचा झपाटय़ाने विकास होत असून शहराची व्याप्ती २५ किलोमीटपर्यंत वाढविण्यात आली आहे. मिहान, कार्गो हब, कळमनामध्ये धान्य बाजार व व्यापारपेठेचा विकास होत असल्याने शहर परिसरात ‘रेल्वे बस’ सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
बिलासपुरात ‘झेडआरयूसीसी’च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ‘झेडआरयूसीसी’ व ‘डीआरसूसीसी’चे सदस्य प्रवीण डबली यांनी हा प्रश्न उपस्थित केला.
मेमू, डेमू आणि प्रवासी रेल्वेगाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठविण्यात आला असून डबे उपलब्ध झाल्यानंतरच प्रवासी गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढविणे शक्य होणार आहे, असे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणेंद्र कुमार यांनी बैठकीत सांगितले.
उपनगरांमध्ये अशाप्रकराच्या गाडय़ा चालविण्यात रेल्वेची तयारी नाही, असे सांगून कन्हान-बुटीबोरीदरम्यान रेल्वे बस, मेमू बस सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावला.
नागपूर शहराचा झपाटय़ाने विकास होत असताना यामध्ये रेल्वेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेने कन्हान-कामठी-कळमना-इतवारी-नागपूर-अजनी-खापरी-बुटोबोरीदरम्यान रेल्वे बस सुरू करावी, अशी मागणी प्रवीण डबली लावून धरली.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना रेल्वेच्या डब्यांमध्ये लावण्यात आलेले ‘साईड मिडल बर्थ’ काढण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी ‘गरीब रथ’मध्ये आजही हे बर्थ कायम असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
‘साईड मिडल बर्थ’ हटविण्याचा प्रस्तावही रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे, असे अरुणेंद्र कुमार म्हणाले.
वातानुकूलित रेल्वे डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणारे नॅपकीन २७ रुपये किमतीचे आहे.
नॅपकीनची किंमत एवढी कशी? प्रवाशांना कमी किमतीचे नॅपकीन देण्याचा प्रस्ताव प्रवीण डबली यांनी रेल्वेला दिला होता.
प्रवाशांना दिलेले नॅपकीन आणि बेडशीटचा एकदा वापर झाल्यानंतर रासायनिक पदार्थाच्या मिश्रनाने यंत्राव्दारे ते स्वच्छ केले जातात, असे उत्तर अरुणेंद्र कुमार यांनी दिले.