शहर परिसरासह उत्तर महाराष्ट्रात विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
प्रभाग क्र. २५मधील पंचशीलनगरमध्ये उपमहापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पश्चिम विभाग सभापती माधुरी जाधव यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मिलिंद जाधव, सुनील गायकवाड, बंटी नेवारे आदी उपस्थित होते.
वावरे महाविद्यालय
सिडकोमधील कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. किशोर पवार यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. पवार यांनी शिवाजी महाराज व जिजाबाई यांच्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राध्यापकांसह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. छात्रसेनेचे प्रमुख प्रा. एस. टी. घुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. डी. जाधव यांनी आभार मानले.
बहुजन स्वराज्य महासंघ
बहुजन स्वराज्य महासंघाच्या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष प्रमोद नाथेकर यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नाथेकर यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन संपूर्ण बहुजन समाज एकसंध राहण्याची गरज व्यक्त केली. शिवरायांनी जातीपातीच्या व्यवस्थेला झुगारून स्वराज्यनिर्मितीचा ध्यास घेतला. त्यांनी तयार केलेल्या स्वराज्यात सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी युवकांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रफिक साबीर शेख, धर्मराज काथवटे, कारभारी काळे आदी उपस्थित होते.
साई सेवक मित्रमंडळ
साई सेवक मित्रमंडळाच्या वतीने जुने नाशिक परिसरात ‘जय शिवाजी, जय भवानी’ असा जयघोष करीत जुने नाशिक परिसरात फेरी काढण्यात आली. साईसेवक व शंभो मित्रमंडळ यांच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अंकुश राऊत, स्वप्निल सोनवणे, सौरभ जानेराव आदी उपस्थित होते.
सुभाष वाचनालय
शहरातील सुभाष सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास किरण विधाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विधाते यांनी छत्रपतींचे जीवन व कार्य या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कार्यवाह मारुती तांबे यांनी केले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे परमानंद पाटील उपस्थित होते.
येवल्यात शोभायात्रा
येवला येथे शिवजयंतीनिमित्त पाटोळे गल्लीतून शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणुकीचे प्रमुख संयोजक सुभाष पहिलवान यांच्या निवासस्थानाजवळ शिवरथातील छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. अग्रभागी एन्झोकेम विद्यालयाचे भगवे फेटेधारी झांजपथक, पाठोपाठ शिवरायांच्या वेशभूषेत घोडय़ावर आरूढ युवक व मावळे होते.
मनमाडमध्ये देखावे
मनमाड शहरात ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, शोभेच्या दारूची आकर्षक रोषणाई, घोडय़ांवर स्वार मावळे आणि ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेले देखावे हे मिरवणुकीचे वैशिष्टय़ होते. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सुनील सानप यांनी सपत्निक पुतळ्याचे पूजन केले. मिरवणुकीत शिवरायांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारे तसेच त्यांच्या जीवनातील प्रमुख घटनांचा इतिहास पुन्हा जिवंत करणारी सजावट करण्यात आली होती. आकर्षक चित्ररथात शिवाजी महाराज, बाल शिवाजी स्वराज्याची शपथ घेताना, भवानी माता शिवरायांना आशीर्वाद देताना हे तीन चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
चोपडय़ात शोभायात्रा
चोपडा येथील हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शिवाजी चौकात शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. पुतळ्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यांच्या समवेत नगरसेवक सुरेश बडगुजर, किशोर चौधरी, देवेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2013 रोजी प्रकाशित
विविध कार्यक्रमांमधून शिवरायांना अभिवादन
शहर परिसरासह उत्तर महाराष्ट्रात विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
First published on: 03-04-2013 at 02:12 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Respects to shivaji maharaj by arrangeing the programs