आत्महत्या टाळण्यासाठी नागरिकांच्या मदतीसाठी ग्रामीण पोलीस व जिल्हा परिषदेच्या संयुक्त प्रयत्नाने दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली हेल्पलाईन बंद पडली असून ‘फोन फिरवा आयुष्य मिळवा’ या योजनेलाही खीळ बसली आहे.
पत्रकारितेतून समाजसेवारूपी ऊर्जा मिळालेल्या डॉ. मनोज शर्मा यांनी नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी रुजू झाल्यानंतर चांगल्या योजना राबविल्या. ‘फोन फिरवा आयुष्य मिळवा’ ही त्यापैकीच एक. ८८८८८१७६६६ या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याची घोषणा त्यांनी दोन वर्षांपूर्वी केली होती. राज्यात असा पहिलाच प्रयोगअसावा. नागपूर जिल्हा (ग्रामीण व शहर) हे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले होते. स्त्री व पुरुषांसाठी हेल्पलाईन उपलब्ध होती. ‘फोन फिरवा आयुष्य मिळवा’ असे आवाहनच या निमित्ताने करण्यात आले होते. मानसशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक जीवनाचे कौशल्य, संभाषण कला आदींचे प्रशिक्षण घेतलेल्या तीन समुपदेशकांची प्रत्येकी आठ तासाप्रमाणे सेवा घेण्यात आली. स्त्री अत्याचार विरोधी परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सीमा साखरे यांचा सक्रिय सहयोग या हेल्पलाईनला मिळाला.
मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व प्रेमभंग आदींमुळे नैराश्य होऊन त्याची परिणती आत्महत्येत होते. आत्महत्या क्षणिक असते. विशिष्ट क्षण निघून गेल्यानंतर आत्महत्या टळू शकते. नैराश्य आलेली, खचलेली व्यक्ती कुणाशी फारशी बोलत नाही. त्यामुळे आत्महत्या टळाव्या, या उदात्त हेतूने ही हेल्पलाईन सुरू झाली होती.
अनेकांनी या हेल्पलाईनची मदत घेतली. या हेल्पलाईनवर संपर्क साधलेल्या एखाद्या व्यक्तीच्या संबंधित पालकांची वा मित्रांची समुपदेशकांनी विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पोलिसांनीही त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींच्या आधारे हेल्पलाईनची मदत घेतली. गरज भासली तेव्हा शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने पीडितांच्या अडचणी, समस्या सोडविण्याचा प्रयत्न झाला. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, तत्कालीन परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, पोलिसांच्या महिला सेलच्या उपनिरीक्षक सुनीता मेश्राम यांनीही हेल्पलाईनसाठी तसेच पीडितांसाठी प्रयत्न केले.  
मात्र, ही चांगली योजना बंद पडली आहे. गुरुवारी दुपारी या क्रमांकावर वारंवार संपर्क साधला तरी ‘ज्या नंबरशी आपण संपर्क साधू इच्छिता तो आता बंद’ असेच उत्तर ऐकायला मिळत होते. ज्या यंत्रणेवरही जबाबदारी सोपविण्यात आली होती त्या यंत्रणेने आता ती कार्यान्वित करण्यास असमर्थता व्यक्त केली असल्याची माहिती आहे. यासंदर्भात अतिरिक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही हेल्पलाईन बंद असल्याची कबुली दिली. योजनेचा उद्देश अत्यंत चांगला असल्याने ती पुन्हा सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव जि. प.कडे सादर करण्यात आला आहे. लवकरच ती सुरू होईल, असा विश्वास त्यांनी ‘लोकसत्ता’जवळ व्यक्त केला.