23 September 2020

News Flash

पावसाळ्यातही मेनहोल्स उघडीच

पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाने शहरातील नाले-नदी स्वच्छ करण्यासोबतच शहरातील चेंबरची स्वच्छता आणि त्यावरील झाकणे लावण्याचे आदेश दिले असतानाही शहरातील अनेक भागातील चेंबर्स आज

| June 19, 2014 09:00 am

वृत्तान्त कॅम्पेन
पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाने शहरातील नाले-नदी स्वच्छ करण्यासोबतच शहरातील चेंबरची स्वच्छता आणि त्यावरील झाकणे लावण्याचे आदेश दिले असतानाही शहरातील अनेक भागातील चेंबर्स आज गायब झाले आहेत. नागपूर शहरात गेल्या काही वर्षांत विस्तार होत असताना शहरातील समस्याही तेवढय़ाच गतीने वाढत आहेत. जागा मिळेल त्या जागी ‘लेआऊट किंवा अपार्टमेंट’ निर्माण झाल्यामुळे शहराचा विस्तार झाला. मात्र, त्या ठिकाणी अद्यापही नागरी सुविधा पुरवण्यात महापालिकेला फारसे यश आलेले नाही. पावसाळ्यात निर्माण होणारी मेनहोल्सची समस्या यातूनच निर्माण झाली आहे. नागनदी आणि पिवळीनदी स्वच्छता मोहीम किंवा २४ बाय ७ च्या योजनेमुळे शहराचे नाव देशभर झाले असले तरी रस्त्यावरील उघडय़ा मेनहोल्स आणि खड्डय़ांमुळे महापालिका टीकेचे लक्ष्यही ठरली आहे.
पावसाळ्यात सर्वाधिक धोकादायक ठरणारी समस्या असेल तर ती उघडे मेनहोल्स. शहरात ठिकठिकाणी आणि विशेषत अपघातासाठी धोकादायक ठरू शकतील, अशा ठिकाणी असलेली मेनहोल्स उघडी असल्याने गेल्या काही दिवसात अपघातांचा धोका वाढला आहे. काही ठिकाणी तर ही मेनहोल्स कचऱ्याची घरे झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणात त्या ठिकाणी गाळ साचून घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. शहरातील १० झोन असून प्रत्येक झोनमध्ये सर्वसाधारण ५ ते ७ हजार मेनहोल्स आहेत. आता हुडकेश्वर आणि नरसाळा या दोन वस्त्या महापालिकेतंर्गत आहेत. त्याही ठिकाणी अशीच अवस्था आहे. धरमपेठ, लक्ष्मीनगर, रामदासपेठ, नंदनवन, मानेवाडा, जागनाथ बुधवारी, इतवारी, दहीबाजार आणि उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात हीच अवस्था आहे. शहरात सध्या दीड हजाराहून अधिक मेनहोल्सवर झाकणे नाहीत आणि जी आहेत त्यातील अनेक तुटलेली किंवा मेनहोल्सच्या बाजूला पडलेली दिसून येतात. झोननिहाय विचार केला तर प्रत्येक झोनमध्ये उघडय़ा मेनहोल्सची संख्या जवळपास १०० ते १५० च्या घरात असल्याची माहिती माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

मेनहोल्सवरील झाकणे लावण्याचे काम वर्षभर सुरू असते. मात्र, पावसाळ्यात हे काम पूर्ण होणे गरजेचे असते. या पाश्र्वभूमीवर शहरातील उघडय़ा मेनहोल्सवर झाकणे नसणे ही बाब गंभीर मानले जाते. यात प्रामुख्याने धोक्याच्या ठिकाणी असलेल्या मेनहोल्सचा समावेश आहे. शहरात उघडय़ा मेनहोल्समुळे यापूर्वी अनेक अपघात झालेले आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ज्या महाल परिसरात राहतात त्या परिसरात ६० मेनहोल्सची झाकणे तुटली आहेत, तर काही ठिकाणी झाकणेच नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत पावसाळ्यात मेनहोल्सच्या ठिकाणी पाणी साचून राहिले तर अनेकदा ते दिसत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. गेल्या वर्षी मेनहोल्समुळे हिस्लॉप कॉलेज चौकात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. आठ दिवसांपूर्वी भोसला वेदशाळेतील फुटपाथवरील मेनहोल्सचे झाकण तुटल्यामुळे त्या ठिकाणी एक मुलगा पडला होता. शहराच्या इतरही भागात फेरफटका मारला असता वर्दळीच्या रस्त्यावर ऐन मध्यभागी उघडे मेनहोल्स आढळते, तर काही ठिकाणी त्यावर दगडे ठेवलेली आढळतात.
अधिकारी आणि नेत्यांची नेहमीच वर्दळ असलेल्या सिव्हील लाईन्स भागात पदपथावरील आणि रस्त्यावरील मेनहोल्स झाकणाविना असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. याशिवाय, वर्धा मार्ग, अजनी रेल्वे स्थानक ते राजीव गांधी पुतळा, कॉटनमार्केट, अमरावती मार्ग, काटोल मार्ग, गांधीबाग, सदर या भागातील रस्त्यांवर उघडे मेनहोल्स आढळतात. शहराच्या अंतर्गत रस्त्यावरची स्थिती याहीपेक्षा वाईट आहे. रस्ते रुंदीकरण केल्यानंतर रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी पदपथावर मेनहोल्स तयार करण्यात आले होते. पदपथाच्या खालून वाहणाऱ्या नाल्या स्वच्छ करण्याचा त्यामागचा हेतू होता. सध्या शहरातील काही भागातील पदपथांचीच अवस्था दयनीय झाली आहे. त्यावरच्या मेनहोल्सबाबत तर बोलायलाच नको.
शहराच्या जुन्या वस्तीतील मेनहोल्सवरील झाकणे जर्जर झाली आहेत. ती बदलण्यात यावी म्हणून नागरिकांनी अर्ज विनंत्या केल्या, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नागरिकांनीच या कामी पुढाकार घेत तेथे सुरक्षेची उपायोजना केली. मेनहोल्सवर झाकणे लावण्यासाठी यावर्षी अर्थसंकल्पात २५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. साधारणत प्रत्येक झोनला त्यासाठी १० ते १५ लाख रुपयांची तरतूद केली जाते. या व्यतिरिक्त नगरसेवकांच्या वॉर्ड निधीतूनही ही कामे केली जातात. महापालिकेच्याच बांधकाम विभागाची यावर देखरेख असते. दरवर्षी कोटय़वधीची रुपये खर्ची पडल्यावरही मेनहोल्स उघडेच असतात. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पथदिवे बंद आहेत. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्यवार मेनहोल्स दिसत नाही. अशावेळी अपघात होण्याचा धोका अधिक असतो. विशेषत दाट लोकवस्तीच्या ठिकाणी, धोकादायक वळणावर आणि वर्दळीच्या रस्त्यावर धोका अधिक असतो. म्हणूनच ही कामे पावसाळ्यापूर्वी करावी, असे आदेश महापौरांपासून तर आयुक्तांपर्यंत आणि सर्वच झोन सभापतींनी दिले. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे सध्या शहरातील उघडे मेनहोल्स धोकादायक ठरले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 9:00 am

Web Title: road main holes open even in the rainy season
टॅग Nagpur News
Next Stories
1 चारचाकी गाडय़ांवरील काळ्या फिल्म्स; सर्वसामान्य नागरिकांबाबत भेदभाव का!
2 सहा जिल्ह्य़ात ३१७ मतदान केंद्रे
3 लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे संपूर्ण वाङ्मय ग्रंथस्वरूपात प्रकाशित करण्यासाठी समिती
Just Now!
X