महाराजबागशेजारील पत्रकार सहनिवासातील चार सदनिकांच्या दारांची कुलपे तोडून चोरटय़ांनी चोरी साधली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यापैकी तीन सदनिकांमध्ये तीन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती, हे विशेष.
पत्रकार वसाहतीमधील बी-१/७ इमारतीमधील प्रदीप मैत्र व ओमप्रकाश शर्मा तसेच बी-१/१८ इमारतीमधील परितोष प्रामाणिक व डॉ. रमेश नांदेडकर यांच्या सदनिकेत ही चोरी झाली. पहाटे फिरायला जाताना नागरिकांना या सदनिकांची दारे उघडी दिसली. आत डोकावून पाहिले असता आतील कपाटे उघडी होती आणि त्यातील सामान विखुरलेले होते. हे समजल्यानंतर सीताबर्डी पोलीस तेथे पोहोचले. नक्की किती ऐवज चोरीस गेला, हे समजू शकलेले नाही. तीन महिन्यांपूर्वी प्रदीप मैत्र, ओमप्रकाश शर्मा व डॉ. नांदेडकर यांच्या याच सदनिकांमध्ये चोरी झाली होती. त्यातील आरोपींचा अद्यापही छडा लागलेला नाही.
वसाहतीत एक दिवसा व रात्री दोन तीन सुरक्षा जवान तैनात असतात. काल रात्री एकच जवान तैनात होता. चोरटय़ांनी नेमकी हीच संधी साधली. सदनिकांची कुलपे तोडण्याचा आवाज शेजाऱ्यांना ऐकू गेला नाही. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Sep 2014 रोजी प्रकाशित
पत्रकार सहनिवासातील चार सदनिकांमध्ये चोरी
महाराजबागशेजारील पत्रकार सहनिवासातील चार सदनिकांच्या दारांची कुलपे तोडून चोरटय़ांनी चोरी साधली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

First published on: 19-09-2014 at 03:17 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in four flat of journalists colony