राज्य सरकारने महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा भूखंड पालिकेला कोणत्या कारणासाठी दिला होता याबाबतचे कागदपत्र तब्बल दोन वर्षे लोटली तरी राज्य सरकारला मिळालेले नाहीत. सरकारदरबारी कागदपत्र नसल्याने भूमी अभिलेख अधीक्षकांच्या कार्यालयात त्यांची विचारणा करण्यात आली होती. मात्र या विभागाकडूनही अद्याप कागदपत्र सरकारदरबारी सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी ‘थीम पार्क’ प्रकल्पाचे घोडे अडले असून पालिकेने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबबरोबर केलेल्या कराराचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही रेसकोर्सवर अश्वशर्यती सुरूच आहेत.
महालक्ष्मी येथील तब्बल ८,५५,१९८.७८ चौरस मीटर भूखंडावर रेसकोर्स उभे आहे. यापैकी २,५८,२४५.४४ चौरस मीटर भूखंड पालिकेच्या, तर ५,९६,९५३.३४ चौरस मीटर भूखंड राज्य सरकारच्या मालकीचा आहे. अश्वशर्यती आणि त्या संदर्भातील सुविधा उभारण्यासाठी हा भूखंड रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडेपट्टय़ाने देण्यात आला होता. पालिका आणि क्लबमध्ये झालेला भाडेपट्टय़ाचा करार ३१ मे २०१३ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे रेसकोर्सचा भूखंड पालिकेने ताब्यात घ्यावा आणि देशी-विदेशी पर्यटक, तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क तेथे उभारावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.
भाडेपट्टा संपुष्टात आल्याने या दोन्ही भूखंडांचा एकत्रित विकास करण्याचा विचार सुरू झाला आणि पालिका प्रशासनाने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने केलेला अटीभंग, न्यायालयीन प्रकरणे, महापौरांची थीम पार्क साकारण्याची सूचना, गटनेत्यांच्या सभेतील याबाबतचा ठराव आदींबाबतचा अहवाल ६ जून २०१३ रोजी नगर विकास विभाग आणि महसूल व वन विभागाला सादर केला. त्यानंतर नगर विकास खात्याचे प्रधान सचिव आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची १८ जून २०१३ रोजी बैठकही झाली. बैठकीमध्ये झालेल्या चर्चेअंती हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला.
शिवसेनेने ‘थीम पार्क’चा हट्ट धरल्यामुळे हा भूखंड सरकारने त्या वेळी कोणत्या कारणासाठी पालिकेला दिला होता याचा शोध सुरू झाला. राज्य सरकारने या भूखंडाबाबत भूमी अभिलेख कार्यालयातील नोंदी सादर करण्याचे आदेश या विभागाच्या अधीक्षकांना दिले. परंतु अद्याप ही माहिती उपलब्ध झालेली नाही, असे नगर विकास खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारकडून आदेश मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतील ‘थीम पार्क’ रेसकोर्सवर साकारावे यासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सभागृहात प्रस्ताव मांडला होता. मात्र तब्बल दोन वर्षे लोटली तरी सरकार अद्याप कागदपत्रांचाच शोध घेत आहे. त्यामुळे रेसकोर्सवर अश्वशर्यती जोमात सुरू असून ‘थीम पार्क’चे घोडे मात्र अडले आहे.