‘सर्वसमावेशक व स्वयंपूर्ण समाज निर्मिती’

पुणे विद्यापीठ व भा. पां. हिवाळे शिक्षण संस्थेचे ग्रामीण विकास अध्ययन केंद्र (सीएसआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ५ जानेवारी दरम्यान नगरमध्ये ‘सर्वसामावेशक व स्वयंपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठीची बांधिलकी’ या विषयावर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास देशभरातील १५० हून अधिक सामाजिक संस्थांचे, विद्यापीठांचे प्रतिनिधी व विविध देशांतील सामाजिक शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब अध्यसन केंद्राचे समन्वयक डॉ. विजय खरे व सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी ही माहिती दिली. सीएसआरडीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गेल्या वर्षी ‘अध्यात्म व समाजकार्य’ विषयावर पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. पहिल्या परिषदेत सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधांच्या स्मरणिकेचे प्रकाशन दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केले जाणार आहे. परिषदेचे उद्घाटन खासदार व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते, पुणे विद्यपाठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे, अखिल भारतीय समाजशास्त्र संशोधन संस्थेच्या पश्चिम विभागाचे संचालक प्रा. गौतम गवळी, हिवाळे शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. फिलिप्स बार्नबस, लेखक फा. फ्रांसिस दिब्रोटो, आंबेडकर अध्यसन केंद्राचे प्रमुख डॉ. रावसाहेब कसबे आदींच्या उपस्थितीत होणार आहे. परिषदेस उपस्थित राहण्यासाठी कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, नायजेरिया, इंग्लंड, अफगणिस्तान आदी देशातील समाजशास्त्रज्ञांनी नावनोंदणी केली आहे. नावनोंदणी डिसेंबर अखेरपर्यंत संकेतस्थळावर चालेल. सामाजिक न्याय, तसेच सर्वसमावेशक व स्वयंपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठीची बांधिलकी वृद्धिंगत होण्यासाठी अध्यात्माची भूमिका जाणून घेणे हा दुसऱ्या परिषदेचा मुख्य हेतू आहे, परिषदेतील व्याख्याने, शोधनिबंध व चर्चेतून स्वयंपूर्ण व टिकाऊ समाज निर्मितीसाठी सामाजिक संस्थांची बांधिलकी वाढीस लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करताना डॉ. खरे व डॉ. पठारे यांनी परिषदेत सामाजिक सलोखा, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, आरोग्य, रोगनिर्मूलन, सामाजिक न्याय, आदी विषयांवर व्याख्याने होतील व शोधनिबंध सादर केले जातील, असे सांगितले.