स्वामित्व हक्काच्या कलमान्वये शहरातील झेरॉक्स सेंटरवर टाकलेल्या छाप्यात ३ लाख ६ हजार ९६५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
के. सागर पब्लिकेशन्सची टीईटी व समग्र बालमानसशास्त्र, अध्ययन पद्धतीच्या पुस्तकांचे झेरॉक्स स्कॅन करून त्याची विक्री केली जात असल्याची तक्रार सागर पब्लिकेशन्सचे जनसंपर्क अधिकारी मिहीर थत्ते यांनी बुधवारी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली. तक्रारीतील तपशिलानुसार खोकडपुरा येथील गुरूप्रसाद झेरॉक्स सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. या वेळी ३ लाख ६ हजार ९६५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. के. सागर प्रकाशनच्या विविध पुस्तकांचे स्कॅन करून त्याची विक्री गुरुप्रसाद झेरॉक्सचे सोमनाथ कचरू दहातोंडे व मशीनचा चालक सचिन किशोर सोनवणे, विशाल सुभाष कावळे यांच्या विरोधात स्वामित्व हक्क कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.