News Flash

ठाण्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वाहनतळ

ठाणे शहरातील वेगवेगळ्या बँकांमध्ये निवृत्तिवेतनासाठी (पेन्शन) खेटे मारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

| December 3, 2013 06:22 am

ठाणे शहरातील वेगवेगळ्या बँकांमध्ये निवृत्तिवेतनासाठी (पेन्शन) खेटे मारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या नागरिकांसाठी बँकांना लागूनच स्वतंत्र वाहनतळ आरक्षित करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून यामुळे बँकांबाहेर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या मनस्तापातून ज्येष्ठ नागरिकांची सुटका होणार आहे.
ठाणे शहरात वाहनतळांच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला असून शहरातील मुख्य भागांमध्ये वाहने उभी करण्यासाठी आरक्षित जागाच नसल्याचे चित्र आहे. नौपाडा, चरई, रेल्वे स्थानक परिसर, पाचपखाडी, तलावपाळी या परिसरात वेगवेगळ्या राष्ट्रीय तसेच सहकारी बँकांचे जाळे पसरले आहे. या बँकांमध्ये निवृत्तिवेतनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या बरीच मोठी आहे. दुचाकीवरून बँकांमध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक लगतच वाहने उभी करतात. मात्र, हा परिसर ‘नो पार्किंग’ झोन असल्यामुळे वाहतूक पोलीस या वाहनांवर कारवाई करतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र वाहनतळाची निर्मिती केली जावी तसेच कारवाईतून त्यांना सूट मिळावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत होती. या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांच्या लगतच स्वतंत्र वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नौपाडा येथील गोखले रोड परिसरात महाराष्ट्र बँकेच्या परिसरात अशा प्रकारचे स्वतंत्र वाहनतळ तयार करण्यात आले असून त्याचा शुभारंभ मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे.
सुरक्षारक्षकांची मदत घेणार
ठाणे शहरातील वागळे, नौपाडा, कळवा, मुंब्रा, घोडबंदर आदी भागातील सुमारे १४ बँकांच्या परिसराची पाहाणी केली असून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र वाहनतळ आरक्षित करण्यात येणार आहे. निवृत्तिवेतनासाठी बँकांमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक शाखेच्या कारवाईमुळे मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळेच ही नवी योजना हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. परोपकारी यांनी दिली. सुमारे एक ते दोन कार आणि चार ते पाच दुचाकी उभ्या राहू शकतील, अशा प्रकारचे वाहनतळ तयार करण्यात येणार असून या ठिकाणी ज्येष्ठांव्यतिरिक्त इतरांनी वाहने उभी करू नयेत, यासाठी बँकांच्या सुरक्षारक्षकाची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 6:22 am

Web Title: separate parking for senior citizens
Next Stories
1 फुकट घरांसाठी सर्वपक्षीय सरसावले
2 लैंगिक छळाचा ई-मार्ग
3 डोंबिवलीत ४ ते ११ डिसेंबर दरम्यान आगरी महोत्सव
Just Now!
X