जमिनीच्या भाडेपट्टय़ाची मुदतवाढ देण्यास ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या नूर मोहम्मद दोस्त मोहम्मद पठाण याच्याकडील मालमत्तेचा शोध अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर संशयाचे ढग जमा झाले आहेत.
कुंडलवाडी येथील शेतकऱ्याला वक्फ बोर्डाची जमीन भाडेपट्टय़ावर दिली होती. भाडेपट्टय़ाची मुदत वाढवण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना पठाण याला शनिवारी रात्री पकडण्यात आले. पठाणच्या मालमत्तेची लाचलुचपत विभागाने सुरुवातीला वेगाने चौकशी केली. त्याच्या घरातील सव्वाकोटी रुपये, तसेच स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. रविवारी दिवसभर ही कारवाई सुरू असताना दुपारी पठाणला अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर चौकशीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. परंतु लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काही लागले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पठाणच्या निवासस्थानातून लॅपटॉप जप्त करण्यात आला. शिवाय नांदेडच्या एका बँकेत त्याचे लॉकरही आहे. त्याची अजून तपासणी झाली नाही. पठाण व त्याच्या नातेवाईकांच्या नावावर नांदेडसह औरंगाबाद, देगलूर, हदगाव, बीड, लातूर तसेच आंध्रप्रदेशातही शेती, सदनिका, घरे अशी मालमत्ता आहे. या मालमत्तेची अधिकृत किंमत लाचलुचपत विभागाने गुलदस्त्यात ठेवली असली, तरी अन्य अधिकाऱ्यांना मात्र अवाक् करणारी आहे.
सध्या पोलीस कोठडीत असलेला पठाण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीत अपेक्षेइतकी माहिती देत नसल्याने एकूण संपत्ती किती याचा तपास मंद झाला आहे. ज्या पद्धतीने नाशिक येथील बांधकाम विभागाचा अभियंता सतीश चिखलीकर याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली. ज्या गतीने त्याची मालमत्ता बाहेर काढली. शिवाय माध्यमांनाही वेळोवेळी त्याची माहिती पुरवली. पठाणच्या कारवाईबाबत मात्र उलट स्थिती आहे. माध्यमांना माहिती देऊ नका, असे फर्मानच गेल्या अनेक वर्षांपासून येथे कार्यरत एका पोलीस उपअधीक्षकाने दिल्याची चर्चा सुरू आहे. चिखलीकर पाठोपाठ नांदेडचा रहिवासी असलेल्या पठाणकडे सापडलेल्या घबाडानंतर आता कोणाचा नंबर लागतो, याचीही चर्चा स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये आहे.