नवी मुंबई पालिकेच्या रबाळे येथील कातकरी पाडय़ावरील छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील एक विद्यार्थिनी आज मुंबईतील व्हीजेटीआयमध्ये इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत असताना याच शाळेतील एक तरी विद्यार्थी आयएएस किंवा आयपीएस व्हावा अशी इच्छा मनाशी बाळगून दिवसरात्र झोपडपट्टीतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी झटणारा एक शिक्षक सध्या कार्यरत आहे. घरच्या मुलांच्या शिक्षणाकडे एकवेळ दुर्लक्ष करणाऱ्या या सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या शिक्षकाचे नाव मारुती गवळी असे आहे.
सोलापूरहून पोटापाण्यासाठी आलेले गवळी सर आता पक्के नवी मुंबईकर झाले आहेत. पालिकेच्या रबाळे झोपडपट्टीतील माध्यमिक शाळेत ते सध्या विद्यादानाचे काम करीत आहेत. सात ते बारा आणि एक ते पाच अशी टिपिकल शिक्षकांची नोकरी न करता गवळी सरांनी विद्यार्थी उत्कर्षांच्या वेगळ्या वाटा चोखाळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच शाळेचा या वर्षीचा दहावी निकाल ९८ टक्के लागू शकला आहे. त्यासाठी गवळी सर विद्यार्थ्यांवर वेगळे परिश्रम घेत आहेत. निर्सगाच्या सान्निध्यात असलेल्या या शाळेत रात्र शिकवणी व अभ्यासवर्ग घेण्यात येत असून दहावीतील विद्यार्थ्यांना जादा शिकवणी दिली जात आहे. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या झोपडपट्टी भागात शिकवणीसाठी मुलांना पाठविण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे गवळी सरांचे वर्ग संध्याकाळी सुरू होतात. त्यातूनच गायत्री महंती नावाची मुलगी ९६ टक्के गुण मिळवून दोन वर्षांपूर्वी संपूर्ण पालिका शाळेत पहिली आली. ती आता व्हीजेटीआयमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. याच शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यांला आयएएस किंवा आयपीएस करण्याचे स्वप्न गवळी सरांनी उराशी बाळगले आहे. तशा विद्यार्थ्यांचा त्यांचे डोळे शोध घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाबरोबरच सामाजिक वनीकरणातून समोरच्या मुंब्रा डोंगरावर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरांनी गतवर्षी ४५० वृक्ष लावले आहेत. झोपडपट्टी भाग असल्याने आई-वडिलांची भांडणे तर पाचवीलाच पुजलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. अशा विद्यार्थी आणि पालकांचे प्रबोधन, समुपदेशन करण्याची जबाबदारी गवळी सर इमानेइतबारे गेली बारा वर्षे पार पाडत आहेत. शुक्रवारी संपन्न होणाऱ्या शिक्षक दिनानिमित्ताने गवळी सरांनी घेतलेला हा वसा इतर शिक्षकांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.