शिराळा आगाराकडून लांब पल्ल्याच्या एसटी बस सुरू करण्यात येणार असून, लवकरच हैदराबादसाठी बस सुरू करण्यात येणार आहे. वारणा-कोडोलीतून पुण्याला सुरू करण्यात आलेली एसटी बस प्रवाशांच्या आग्रहास्तव १५ एप्रिलपासून सकाळी साडेदहा वाजता सोडण्यात येईल, असे शिराळा एसटी आगाराचे व्यवस्थापक एस. के. कुलकर्णी यांनी सांगितले.    
सांगली जिल्हय़ातील शिराळा एसटी डेपोच्या वतीने वारणा-कोडोली आदी परिसरातील मार्गावर नियमितपणे बससेवा सुरू केली आहे. कोडोली-वडगाव मार्गावर सुरू असलेल्या मिनी बससेवाही सर्वच प्रवाशांना उपयुक्त ठरत आहेत. यातील फेऱ्यात वाढ करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.    
वारणा-कोडोली ते पुणे या मार्गावर बससेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या बससेवेच्या मार्गामध्ये बदल करण्याची प्रवाशांची मागणी असल्याचे सुराज्य फाऊंडेशनचे एन. एच. पाटील व विश्वासराव जाधव यांनी मागणी केली. या मागणीनुसार १५ एप्रिलपासून पुणे येथे जाणारी एसटी सुरू करण्यात येणार आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.