लातूर रेल्वेसंदर्भातील विविध समस्या सोडवता याव्यात, यासाठी आमदार अमित देशमुख यांनी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. गुलबर्गा मतदारसंघात काँग्रेसला यश मिळवून देण्यात अमित देशमुख यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो. या पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्री कर्नाटकातील असल्यामुळे ही भेट लातूरकरांसाठी फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जाते.
लातूर, उस्मानाबाद, बार्शी या रेल्वेस्थानकांचा दर्जा अनुक्रमे ड व ई आहे. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी स्थानकाचा दर्जा वाढवावा, लातूर रेल्वेस्थानकाचे अपग्रेडेशन करून कँटीन, बुक स्टॉल, चहा, नाश्ता, आदी सुविधा व्हाव्यात. लातूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी ४०० मीटपर्यंत वाढवावी. तसेच उपाहारगृह, बुक स्टॉल, व्हीआयपी प्रतीक्षालयाची आवश्यकता असल्याचे आमदार देशमुख यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले. आरक्षणाच्या वेळेमध्ये बदल न करता आरक्षणाची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवावी, फलाट क्रमांक १ वरून २ वर जाण्यासाठी पादचारी पुलाची आवश्यकता, तसेच रेल्वेस्थानकावर पाऊस व उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी दोन्ही फलाटांवर प्रवासी निवारा शेड आवश्यक आहे. माल साठवणुकीसाठी वाढीव गोदामाची आवश्यकता आहे, अशा मागण्या आमदार देशमुख यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सादर केल्या.
लातूर-मुंबई रेल्वे पूर्ववत ठेवावी
लातूर-मुंबई रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. रेल्वेचे उत्पन्न विभागात सर्वाधिक आहे. त्यामुळे लातूर-मुंबई-लातूर अशीच रेल्वे कायम ठेवावी. पुणे-हैदराबाद रेल्वे सध्या एक दिवसाआड आहे, ती नियमित सुरू ठेवावी. लातूर-तिरुपती सुरू करावी. उदगीर-मुंबई नवीन रेल्वे सुरू करावी. लातूर-मुंबई रेल्वेस मुरूड येथे थांबा द्यावा. लातूर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करावी, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.