राज्य शासनाकडून भारनियमन मुक्तीच्या वारंवार घोषणा करण्यात येत असल्या तरी जळगाव शहरात अद्यापही दररोज सहा ते सात तास भारनियमन सुरूच आहे. त्यात वीज चोरी तसेच ग्राहकांकडील थकबाकीचा जाच प्रामाणिक ग्राहकांना होऊ लागला आहे.
शहरात वीजचोरीसह थकबाकीचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर आहे. नियमित बिल भरणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. असे असताना वीजचोरी व थकबाकीचा भरूदड संपूर्ण शहरावर लादण्याचा प्रकार केला जात असल्याने ग्राहकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. शहरातील ज्या भागात थकबाकीचे प्रमाणच नसेल व ज्या भागात वीजचोरी अजिबात होणार नसेल, त्या परिसराची भारनियमनातून मुक्ती करण्यात येईल असे गेल्याच वर्षी जाहीर करण्यात आले होते. या घोषणेला वर्ष पूर्ण होऊनही शहरातील कोणताच भाग भारनियमनमुक्त झालेला नाही. शहरात वीजचोरी नेमकी कुठे होते, बडे थकबाकीदार कोण, कोणत्या भागात थकबाकीचे प्रमाण अधिक आहे, याचा सर्व लेखाजोखा कंपनीकडे आहे. शहराच्या बळीरामपेठ व नवीपेठ परिसरात वीजचोरी व थकबाकीचे प्रमाण शून्यावर असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 2:26 am