पोटाची खळगी भरण्याची जबाबदारी बालवयातच आल्याने अनेक बालक आजही आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करण्यासाठी कचऱ्यातील भंगार वेचून जीवन जगण्याचा मार्ग शोधत आहे.  अशांमध्ये एक-दोन नव्हे, तर असंख्य बालकांचा समावेश म्हणजे हा दारिद्रय़ाचा भाग तर आहेच, परंतु समाजासाठी व शासनासाठी हा चिंतन करणारा विषयही आहे.  
एकीकडे गरीब व श्रीमंतीची दरी वाढत असताना त्यामागील कारणांचा शोध घेत त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. शासन गरीब व गरजू विद्र्यार्थ्यांंचा प्राथमिक शिक्षणावर कोटय़वधी रुपये खर्च करते तरीही जेव्हा असे चित्र समोर येते तेव्हा संबंधित यंत्रणा कुठेतरी चुकत आहे, असा भास निर्माण होतो. वाढत्या लोकसंख्येसोबत अंत्यत हालाखीचे जीवन जगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  झोपडय़ांमध्ये राहून मोलमजुरी करून पोटाची खळगी भरण्याची संख्या आर्णी या मागास तालुक्यात मोठय़ा प्रमाणात आहे.  आदिवासी व मागावर्गीयबहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्णी भागात ही समस्या दिवसेंदिवस तीव्र रूप धारण करीत आहे. शिक्षणाशिवाय जीवनात प्रकाश निर्माण होऊ शकत नाही.
शिक्षण घराघरात गेले पाहिजे. यासाठी शासनाने शिक्षण सक्तीचे केले आहे, परंतु आजही असंख्य मुले शिक्षणापासून भरकटली आहेत. ७ ते ११ वर्षांची मुले कचऱ्यातून भंगार वेचून आणि त्यांची विक्री करून आपल्या व कुटुंबाचा जगण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, हा प्रयत्न किती फसवा आहे त्याची कल्पना त्यांना येऊ नये हा त्यांचा दोष नव्हे, तर त्याला पालक व शिक्षक जबाबदार आहे.  प्लास्टिक, लोखंडाचे तुकडे, पाॅिलथीन, बिस्लेरी बॉटल वेचून विकण्यात मग्न असणारे हे बालक बाराखडीला हुलकावणी देत आहेत. त्यामुळे पुढे यांचा कल गुन्हेगारी व चोरी करण्याच्या दिशेने जाण्याची भीती का बाळगू नये, असा प्रश्न उपस्थित होतो.
आर्णीचा विस्तार दिवसेंदिवस झपाटय़ाने होत असला तरी असंख्य बालके हक्काच्या शिक्षणापासून दुरावले आहेत. एका ११ वर्षांच्या भंगार वेचणाऱ्या बालकाची भेट घेतली असल्या त्याला शाळेचा गंधही नव्हता. वडील लहानपणीच वारल्याने अांधळ्या आईला आधार देण्यासाठी मी कचऱ्यातून भंगार वेचतो आणि आईच्या पोटाची खळगी भरतो, असे तो म्हणाला. त्याच्यासोबत असलेल्या दोन साथीदार बालकांनी सुध्दा वडील वारल्याने आमच्यावर अशी वेळ आली. शिक्षण नसले तरी सकाळीच पिशव्या घेऊन फिरून कचऱ्याच्या ढिगातून मिळणारे भंगार विकून येणाऱ्या पैशातून आमचा उदरनिर्वाह चालतो, असे डोळ्यात पाणी आणून प्रतिक्रिया व्यक्त केली.   अनेक बालके आजही दुकानात सुध्दा कुटुंबाला आधार देण्यासाठी हॉटेल व्यवसायात काम करतात. या सर्व बाबीसाठी शासनाचे कायदे व नियम आहे. शिक्षण विभागात भरपूर अुनदान व तरतुदी आहेत.  त्याबाबत मंथन करण्याची आवश्यकता असून आर्थिक परिस्थिती कारणीभूत ठरत असली तरी त्याला निश्चितच आधार देण्याची गरज समाजातील शिक्षण विभागाची, गुरुजनांची व पालकांची आहे.