फेरीवाल्यांचा सुळसुळाट, भिकारी, गर्दुल्ले, भटकी कुत्री यांचा वावर; पावसाळ्यात होणारी गळती; अस्वच्छता, तुटलेल्या पायऱ्या हे चित्र आहे मुंबईमधील पादचारी भुयारी मार्गाचे. बहुतांश भुयारी मार्ग पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे असल्याने तेथे नागरिकांचा वावर प्रचंड आहे. परंतु सुरक्षा व्यवस्थेचा अभाव, अस्वच्छता यामुळे आता हे भुयारी मार्ग असुरक्षित बनू लागले आहेत. भुयारी मार्गाच्या देखभालीची जबाबदारी पालिकेची आहे. मात्र डागडुजी आणि देखभालीसाठी सध्या पालिका दरबारी कंत्राटदारच नाहीत. त्यामुळे एकूणच भुयारी मार्गाची अवस्था गंभीर बनू लागली आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेटसह संपूर्ण मुंबईमध्ये १९ भुयारी मार्ग आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि चर्चगेट रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या पादचारी भुयारी मार्गामधून मोठय़ा संख्येने प्रवासी जा-ये करीत असतात. या भुयारी मार्गामधील गाळ्यांमध्ये विविध वस्तूंची दुकाने आहेत. मात्र या दुकानांमधील मार्ग प्रवाशांच्या जाण्या-येण्याच्या मार्गातच थाटण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे. पश्चिम उपनगरांमधील १० पैकी बहुतांश भुयारी मार्ग पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे आहेत. त्यामुळे या भुयारी मार्गामधून जा-ये करणाऱ्या नागरिकांची गर्दी असते. तसेच या भुयारी मार्गाच्या कोपऱ्यांमध्ये गर्दुल्ले, भिकाऱ्यांनी आपल्या पथाऱ्या पसरल्या आहेत. काही भुयारी मार्गाकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याने तेथे समाजकंटकांनी आपले अड्डे बनविले आहेत. या भुयारी मार्गाच्या देखभालीबरोबरच सुरक्षेची जबाबदारी पालिकेची आहे. भुयारी मार्गाच्या स्वच्छतेसाठी पालिका सफाई कामगारांची नियुक्ती करते. परंतु भुयारी मार्ग स्वच्छ होताहेत की नाही यावर देखरेख मात्र कुणीच ठेवत नाहीत.

भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठी पूर्वी पालिकेने कंत्राटदारांची नियुक्ती केली होती. परंतु ३१ मार्च २०१४ रोजी या कंत्राटदारांची मुदत संपुष्टात आली आहे. परंतु एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी नव्या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे भुयारी मार्गाची अवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून त्याचा फटका पादचाऱ्यांना सोसावा लागत आहे.

 

गोरेगावमधील पादचारी भुयारी मार्गाच्या निमित्ताने गेल्या तीन वर्षांपासून आपण प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. पण भुयारी मार्गातील स्वच्छतेसाठी पालिका अधिकाऱ्यांच्या हातापाया पडायला लागते. मुंबईतील बहुतांश भुयारी मार्गाची अवस्था अशीच आहे. अनेक भुयारी मार्ग पावसाळ्यात गळत असूून त्यामुळे पादचाऱ्यांना साचणाऱ्या पाण्यातून चालावे लागते. तुटलेल्या पायऱ्या, गर्दुल्ले-भिकाऱ्यांचा वावर यामुळे काही ठिकाणचे भुयारी मार्ग पादचाऱ्यांना नकोसे झाले आहेत. या भुयारी मार्गामध्ये सुरक्षारक्षकही नेमण्याची गरज आहे. परंतु पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

वर्षां टेंबवलकर, शिवसेना नगरसेविका