शाळेतील मैदानावर खेळत असताना अचानक ११ वर्षांच्या मुस्कान मनच्या डाव्या पायाचा गुडघा मुरगळला आणि ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर गेली सहा महिने मन कुटुंबीय विविध हाडांच्या डॉक्टरांकडे औषधोपचार करीत होते. गोळ्या, इंजेक्शन, प्लास्टर करून होईल म्हणून वाट पाहणाऱ्या मुस्कानच्या आई-वडिलांच्या डोळ्यातही मुस्कानच्या वेदना बघून अश्रू दाटले होते. अखेर वाशी येथील फोर्टीज रुग्णालयाचे डॉ. सिद्धार्थ यादव यांनी मुस्कानच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि आज चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमटले. ती पुन्हा मैदानात इतर मुलीसारखीच खेळणार आहे.
वाशी येथे राहणारी मुस्कान मन मानखुर्दच्या केंद्रीय विहार शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकते. एक दिवस शाळेत पीटीच्या तासाला मैदानावर खेळत असताना अचानक मुस्कानचा डावा पाय काटकोनात फिरला. तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. तो जोरात मुरगळल्याने गुडघ्याच्या कवटीजवळील स्नायू आणि हाड दोन्ही तुटल्याचे नंतर काढण्यात आलेल्या एमआरआयमध्ये स्पष्ट झाले. सर्वसाधारणपणे हाडाच्या दुखण्यावर डॉक्टर औषधांचा प्रयोग करून आतील तुटलेले स्नायू सांधण्याचा प्रयत्न करतात.
मुस्कानच्या वडिलांनी पहिल्यांदा नेलेल्या हाडांच्या डॉक्टराने तेच केले. पण त्यामुळे मुस्कानच्या वेदना काही कमी होण्याचे नाव घेत नव्हते. सहा महिने मुस्कान वेदनांनी विवळत होती. शेवटी मुस्कानच्या आईवडिलांनी दोन दिवसापूर्वी मुस्कानला वाशी येथील फोर्टीज रुग्णालयात दाखल केले. डॉ. सिद्धार्थ यादव यांनी मुस्कानच्या पायाची तपासणी केल्यानंतर त्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया करण्याची वेळ खेळाडूंवर अनेक वेळा येते, पण ११ वर्षांच्या मुलीवर अशी वेळ पहिल्यांदाच आली होती. चार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर डॉ. यादव यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे मुस्कान पुन्हा मैदानावर खेळण्यास आता मोकळी झाली आहे.