देशात सर्वात वेगाने नागरीकरण होत असलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील मध्य रेल्वेचे स्थानक असूनही अद्याप गावपण राखून असलेले अंबरनाथ तालुक्यातील वांगणी हे ५० वर्षांपूर्वी तर अगदीच लहानसे खेडे होते. तेव्हा म्हणजे १९६४ मध्ये कर्जत येथील अभिनव ज्ञानमंदिर या संस्थेने वांगणी येथे महात्मा फुले विद्यामंदिर या शाळेच्या रूपाने ज्ञानदानाचे रोपटे लावले. यंदा या शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त संस्थाचालकांनी सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षकांना हाक दिली. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी शाळेत भरलेल्या पहिल्या वर्गातील काही माजी विद्यार्थीही संमेलनाला आवर्जून उपस्थित होते.
१९६४ मध्ये कर्जत येथील अभिनव ज्ञानमंदिर संस्थेच्या माध्यमातून वांगणीत महात्मा फुले विद्यामंदिर शाळेची स्थापना झाली. या शाळेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजी-माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन भरवण्यात आले होते. शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वांगणीतील शाळूसोबत्यांची कित्येक वर्षांनंतर पुनर्भेट झाली. तब्बल सातआठशे माजी विद्यार्थी आणि शिक्षक या संमेलनास उपस्थित होते.
या वेळी जवळपास सहाशे ते सातशे माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावून जुन्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. तब्बल पंचवीस ते तीस वर्षांनंतर त्याच शाळेत पुन्हा भेटणारे हे विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी वातावरण पुरते भारावून गेले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने शाळेतील सर्व आजी-माजी शिक्षकांचा त्यांच्याच विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या मेळाव्यादरम्यान शाळेतून गुणवत्ता यादीत आलेला पहिला विद्यार्थी दीपक पडवळ याने तयार केलेली ध्वनिचित्रफीत खास लक्षवेधी ठरली.
शाळेच्या उपक्रमांचे फोटो एकत्रित करून त्याचं सादरीकरण या वेळी करण्यात आले. त्या वेळी पडद्यावर शाळेतल्या जुन्या आठवणी पाहताना कल्ला करण्याचा मोह माजी विद्यार्थ्यांनाही आवरता आला नाही. या आठवणी पुन्हा एकदा सर्वाना विद्यार्थीदशेत घेऊन गेल्या. मेळाव्याचे अैचित्य साधून सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर एप्रिल महिन्यातही शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त भव्यदिव्य कार्यक्रम हाती घेण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला.