ऑगस्ट महिन्यात तब्बल ३३ हजार ५६६ पासपोर्ट वितरित करून ठाणे कार्यालयाने विक्रम प्रस्थापित केला आहे. साधारणत: दर महिन्याला ठाणे विभागाकडून सरासरी १७ हजार पासपोर्ट वितरित होतात. गेल्या महिन्यात त्याच्या जवळपास दुप्पट पासपोर्ट वितरित झाले आहेत. गेले काही महिने नव्या पासपोर्ट छपाईची कामे थांबली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात सर्व थकीत प्रकरणे मार्गी लावण्यात आल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.
ठाणे पासपोर्ट कार्यालयात दरदिवशी एक हजार अर्ज पासपोर्टसाठी सादर केले जातात. त्यांची छाननी, कागदपत्र तपासणी आणि पोलीस चौकशी झाल्यानंतरच जलद टपाल सेवेद्वारे पासपोर्ट वितरित केले जातात. पासपोर्ट ठाणे विभागात ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्हे येतात. १९९६ मध्ये ठाण्यात पासपोर्ट विभाग कार्यान्वित झाला. २००१ पासून वागळे इस्टेट येथे स्वतंत्र इमारतीत पासपोर्ट विभागाचे कामकाज सुरू आहे. नागरिकांना पासपोर्ट मिळणे अधिक सुलभ व्हावे म्हणून पोलीस पडताळणी अहवाल आता ऑनलाइन सादर केला जातो. त्यामुळे वेळ वाचला आहे. १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका असल्याने पासपोर्ट कार्यालय बंद असेल. त्यामुळे ज्यांना कार्यालयातील संगणकीय प्रणालीद्वारा ही तारीख मिळाली असेल, त्यांनी त्याऐवजी १८ ऑक्टोबर रोजी यावे, असे आवाहन प्रमुख पासपोर्ट अधिकारी पी. डी. शर्मा यांनी केले आहे. याविषयीची अधिक माहिती २५८३०११६/ २० या दूरध्वनी क्रमांकांवर कार्यालयीन दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत मिळू शकेल, असेही पासपोर्ट विभागाने कळविले आहे.