ठाण्यात दहीहंडी उत्सवानिमित्ताने दिवसभर सुरू असणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या दणदणाटावर कारवाई करण्यात पोलीस पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असताना या मंडळांना संरक्षण देण्यात गुंतलेल्या पोलिसांवर सामाजिक कार्यकर्ते आणि दक्ष नागरिकांनी मात्र वचक निर्माण केल्याचे चित्र दिसून आले. आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे लक्षात येताच शहरातील वेगवेगळ्या भागांत राहाणाऱ्या दक्ष नागरिकांनी पोलीस ठाण्यांशी संपर्क साधत तक्रारींचा पाढाच वाचण्यास सुरुवात केली. त्यामुळे बडय़ा नेत्यांच्या दहीहंडय़ांना सुरक्षाकवच पुरविण्यात दंग असलेल्या पोलिसांनी मोठय़ा आवाजाचा दंगा घालणाऱ्या मंडळांविरोधात रात्री उशिरा का होईना गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली.    
ध्वनी मर्यादेची पातळी ओलांडणाऱ्या मंडळांविरोधात कारवाई करावी यासाठी ठाण्यातील दक्ष नागरिक गुरुवारी दिवसभर ठाणे पोलिसांकडे तक्रारी करत होते. तरीही पोलिसांनी या तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणारी बहुतेक मंडळे  शहरातील बडय़ा राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे या मंडळांपुढे पोलीस सपशेल शरणागती स्वीकारतात, असेच चित्र दरवर्षी दिसून येते. गुरुवारी त्यामध्ये थोडाही बदल झाला नव्हता. ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाचे गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणावर बाजारीकरण झाले आहे. लाखमोलाच्या दहीहंडय़ा उभारताना वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात ही मंडळे आघाडीवर असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दहीहंडी उत्सवात मोठय़ा प्रमाणात डीजेचा दणदणाट करून ध्वनी प्रदूषण केले जाते. दरवर्षी पोलीस विभागाकडून अशा मंडळांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात येतात. मात्र, या पथकांच्या डोळ्यादेखत डीजेचा दणदणाट सुरूच असतो. यंदाही ठाणे शहरातील पाचपखाडी, गोखले रोड, हरीनिवास, वर्तकनगर, रहेजा कॉम्पलेक्स परिसर, टेंभी नाका, जांभळी नाका, बाळकूम आदी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात ध्वनी प्रदूषणाने टोक गाठले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे, काँग्रेसचे रवींद्र फाटक आदी मोठय़ा नेत्यांच्या मंडळांनी डीजेचा दणदणाट करत यंदाही सर्व नियमांना वाकुल्या दाखविल्याचे दिसून आले.
या दहीहंडी उत्सवांना मोठा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. डीजेच्या दणदणाटाने आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या मंडळांना रोखण्याची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. असे असतानाही डोळ्यादेखतच सुरू असलेला डीजेचा धिंगाणा पोलीस विभाग निमूटपणे पाहत असल्याचे दिसून आले. ठाण्यातील दक्ष नागरिक प्रदीप इंदूलकर यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता, अशा मंडळांवर रात्री दहा नंतर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी उत्तरे देण्यात आली. तसेच दक्ष नागरिक नितीन देशपांडे यांनी ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाकडे या मंडळांसंदर्भात तक्रारी केल्या. उत्सवाच्या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांकडे तुम्ही तक्रार का केली नाही, त्यांचे सहकार्य का घेतले नाही, अशी त्यांना उलट विचारणा झाली. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या दबाबाखाली ठाणे पोलीस विभाग कशा प्रकारे काम करतो आहे, याचे उत्तम उदाहरण यातून दिसून येते. पोलीस यंत्रणा स्वतचे अधिकार योग्य प्रकारे वापरत नसताना शहरातील दक्ष नागरिक मात्र तक्रारी करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र होते.