प्रवाशांची सोय पाहण्याऐवजी त्यांना त्रास कसा होईल, याचा प्रत्यय सध्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना येत आहे. प्रवाशांच्या सोयीचे मध्य रेल्वेला वावडे असल्याची चर्चा सध्या प्रवाशांमध्ये सुरू आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून रात्री ९.५४ ची कल्याण आणि ९-५८ च्या खोपोली गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचा हा अनुभव येत आहे.
९.५४ ची कल्याण गाडी १५ डब्यांची असल्याने नेहमीच प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर लागते. या गाडीचा फलाट कधीही बदलला जात नाही.    तर ९.५८ ची खोपोली लोकल १२ डब्यांची असून साधारणपणे प्लॅटफॉर्म ६ वरून सुटते.
७ आणि ६ प्लॅटफॉर्म एकमेकांना लागून असल्याने दोन्ही गाडय़ांच्या प्रवाशांना ते सोयीचे ठरते. दोन्हीपैकी कोणतीही गाडी अगोदर आली तरी प्रवासी त्याप्रमाणे गाडीत चढतात.मात्र गेल्या काही दिवसांपासून ९.५४ ची १५ डब्यांची कल्याण गाडी १०-१५ मिनिटे उशिरा येत आहे. तर ९.५८ ची खोपोली लोकल ६ ऐवजी प्लॅटफॉर्म ५ वर आणली जात आहे.
गेल्या काही दिवसांत असा प्रकार अनेकदा झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. ९-५४ ची कल्याण लोकल उशीरा असेल तर पूर्वी ९-५८ ची खोपोली लोकल फलाट क्रमांक ६ वर लागत असल्याने कल्याण लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना अगोदर आलेली खोपोली गाडी सहज पकडता येत होती.
आता बरेचदा खोपोली गाडी ५ वर आणली जाते. प्लॅटफॉर्म ७ वरील कल्याण लोकल उशीरा येत असेल तर प्रवाशांना खोपोली गाडी पकडण्यासाठी पादचारी पूल चढून प्लॅटफॉर्म ५ वर यावे लागत आहे. या गोंधळात काही प्रवासी खोपोली गाडी पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून उडी मारून ५ वर जातात. पूर्वीप्रमाणे खोपोली गाडी क्रमांक ६ वर आणण्यात रेल्वेला काय अडचण आहे, असा सवाल प्रवासी करीत आहेत.