ठाणे महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची हजेरी लावण्यासाठी मुख्यालय आणि नऊ प्रभाग समित्यांमध्ये बायोमॅट्रिक अटेन्डस सिस्टीम (थम रीडिंग) बसविण्यात आली होती. मात्र, ही यंत्रणा बंद पडावी, यासाठी काही वात्रट कर्मचारी या यंत्राची तोडफोड तसेच त्यावर च्युईंगगम चिकटवीत असल्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. याच पाश्र्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने अशा वात्रट कर्मचाऱ्यांना दणका देत बायोमॅट्रिक अटेन्डस सिस्टीम (फेस रीडिंग) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना हजेरी लावण्यासाठी या यंत्राच्या स्क्रीनसमोर उभे राहावे लागणार असून अवघ्या दोन सेकंदाच्या आत कर्मचाऱ्यांचा फेस रीडिंग होऊन त्यांची हजेरी लागणार आहे. त्यामुळे या यंत्रणेला महापालिकेचे नवे हजेरी ‘फेसबुक’ असेच म्हणावे लागेल.  

लेटलतीफ तसेच कामावर न येताही हजेरीबुकात नोंद करणाऱ्या कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना दणका देण्यासाठी महापालिकेने बायोमेट्रिक अटेन्डस सिस्टीम (थम रीडिंग) सुरू केली होती. अंगठय़ाच्या साहाय्याने ही हजेरी लागत होती. महापालिका मुख्यालयासह नऊ प्रभाग समित्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे लेटलतीफ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. त्यामुळेच ही यंत्रणा बंद पडावी, यासाठी काही वात्रट कर्मचारी कार्यरत होते. या यंत्रावर च्युईंगगम चिकटविणे तसेच यंत्राची स्क्रीन फोडणे, असे प्रकार त्यांच्याकडून वारंवार सुरू होते. याच पाश्र्वभूमीवर महापालिकेने ही यंत्रणा बाद करून त्याऐवजी बायोमॅट्रिक अटेन्डस सिस्टीम (फेस रीडिंग) सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका मुख्यालय तसेच नऊ प्रभाग समित्यांमध्ये एकूण १७ यंत्रे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी येत्या ८ डिसेंबरला निविदा मागविण्यात आल्या आहेत.
’  सीम कार्ड पद्धत..
यापूर्वी बायोमॅट्रिक अटेन्डस सिस्टीम (थम रीडिंग) वायरींद्वारे जोडण्यात आली होती. त्यामुळे वायर तुटल्यास यंत्रणा ठप्प होण्याचे प्रकार घडत होते. मात्र, बायोमॅट्रिक अटेन्डस सिस्टीम (फेस रीडिंग) या नव्या यंत्रणेमध्ये वायरचा वापर होणार नसून मोबाइल सीम कार्ड पद्धतीने ही यंत्रणा कार्य करणार आहे. त्यामुळे स्क्रीनची जागा बदलली, तरीही यंत्रणा सुरळीतपणे सुरू राहणार आहे, असेही स्वरूप कुलकर्णी यांनी सांगितले.
’  सफाई कामगारांनाही यंत्रणा लागू
महापालिकेच्या हजेरी शेडवरही अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे हजेरी शेडवरील लेटलतीफ कामगारांनाही आता दणका बसणार आहे. तसेच काही कामानिमित्त अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना मुख्यालयात येत नाहीत, त्यांना यापूर्वी हजेरी बुकमध्ये हजेरी लावावी लागत होती. मात्र, नव्या यंत्रणेमुळे त्यांना मुख्यालय तसेच प्रभाग समित्यांमधील कोणत्याही यंत्रावर हजेरी लावता येणे शक्य आहे.   
फेस रीडिंग सिस्टीम..
बायोमॅट्रिक अटेन्डस सिस्टीम (फेस रीडिंग) ही नवी यंत्रणा बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सर्वच अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्याचे चारही बाजूचे फोटो तसेच त्यांची इत्थंभूत माहितीही यंत्रणेच्या माहिती केंद्रात नोंद करण्यात येणार आहे. अवघ्या चार इंचाचा टीव्ही स्क्रीन मुख्यालय तसेच प्रभाग समित्यांमध्ये बसविण्यात येणार असून या स्क्रीनसमोर अधिकारी तसेच कर्मचारी उभे राहिल्यास त्यांची अवघ्या दोन सेंकदाच्या आत हजेरी लागणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सिस्टीम व्यवस्थापक स्वरूप कुलकर्णी यांनी दिली.