‘बाल गोविंदां’ना दहीहंडीच्या दिवशी किंवा त्यापूर्वी सरावात सहभागी करून घेण्यास बाल हक्क संरक्षण आयोगाने बंदी घातली आहे. मात्र काही गोविंदा मंडळांकडून त्याची सर्रास पायमल्ली केली जात आहे. त्याचे पर्यवसान मुंबईत दोन बाल गोविंदांच्या मृत्यूत झाले. त्यामुळे कृष्णजन्माष्टमीची ‘मृत्युष्टमी’करणाऱ्या गोविंदा मंडळांवर पोलीस आता काय कारवाई करतात, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली आहे. १२ वर्षांखालील बाल गोविंदांसंदर्भावर बालहक्क संरक्षण आयोगाने घातलेल्या बंदीची अंमलबजावणी राज्य शासनाने गांभीर्याने करावी, अशी सूचना त्यांनी राज्य शासनाला केली आहे.
नवी मुंबईतील किरण तळेकर (१४) या बाल गोविंदाचा सरावादरम्यान मृत्यू होऊन काही तास उलटत नाही तोच रविवारी मुंबईत जोगेश्वरी येथे हृषीकेश पाटील या बाल गोविंदाचा मृत्यू झाला. प्रत्यक्ष दहीहंडीच्या दिवशीही उंच थरावरून पडून गोविंदा गंभीर जखमी होण्याच्या तसेच मृत्युमुखी पडण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे यंदा या सगळ्या घटनांची गंभीर दखल घेऊन बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष उज्ज्वल उके यांनी कठोर भूमिका घेतली. मात्र आयोगाचे आदेश धाब्यावर बसवून लहान मुलांना दहीहंडीच्या सरावात सहभागी करून घेतले जात आहे. १२ वर्षांखालील मुलांना थरावर चढविले गेले तर त्या मंडळावर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले आहे. तर भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री मनेका गांधी यांना पत्र पाठवून बाल गोविंदांच्या सहभागावर बंदी घालण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याची मागणी केली होती.
अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांची
बाल हक्क संरक्षण आयोगाने या संदर्भात लेखी आदेश काढले असून त्याची प्रत पोलिसांनाही पाठविली आहे. आता पुढील अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. नवी मुंबई आणि मुंबईत बाल गोविंदांच्या मृत्यूच्या घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत. अशा घटना घडू नयेत म्हणूनच आयोगाने हे आदेश काढले आहेत.
– उज्ज्वल उके
अध्यक्ष बाल हक्क संरक्षण आयोग