25 February 2021

News Flash

टोलआकारणी विरुध्द आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याच्या प्रयत्नांना वेग

कोल्हापूर शहरातील टोलआकारणीविरुध्द संपूर्ण जिल्ह्य़ात आंदोलनाची लाट उसळली असताना आता त्याची व्याप्ती राज्यभर पसरविण्यासाठी आंदोलकांचे प्रयत्न सुरू आहेत.

| June 24, 2013 01:04 am

कोल्हापूर शहरातील टोलआकारणीविरुध्द संपूर्ण जिल्ह्य़ात आंदोलनाची लाट उसळली असताना आता त्याची व्याप्ती राज्यभर पसरविण्यासाठी आंदोलकांचे प्रयत्न सुरू आहेत. रविवारी राज्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार यांना निवेदन पाठवून आंदोलनाला पाठिंबा देण्याबरोबरच आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील या जिल्ह्य़ातील दोन मंत्र्यांसह बहुतेक आमदारांनी टोलविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यापुढे या आंदोलनाला राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडून व मंत्र्यांकडून कसा प्रतिसाद मिळणार हे लक्षवेधी ठरले आहे.
कोल्हापूर शहरामध्ये अंतर्गत रस्त्यांचे काम आयआरबी कंपनीने केले आहे. या कंपनीकडून टोलआकारणीच्या  हालचाली सुरू आहेत. याविरोधात शहरातील सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडले जात आहे. कृती समितीने मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुश्रीफ व पाटील या मंत्रीव्दयांनी दोन दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन आंदोलनात सहभागी असल्याचे घोषित केले होते. आपल्या सहभागाबद्दल शंका घेऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले होते.    
जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदार यांचा पाठिंबा मिळविल्यानंतर कृती समितीने राज्यातील सर्वच मंत्री, खासदार, आमदार यांचे पाठबळ मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी लोकप्रतिनिधींना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मंत्रालयीन पातळीवरून जनतेच्या मनाविरुध्द रस्ते प्रकल्प कोल्हापूरकरांवर लादला गेला आहे. महालक्ष्मीचे तीर्थक्षेत्र व राजर्षी शाहूंची नगरी असलेल्या या शहरात टोलला जोरदार विरोध केला जात आहे. परंतु आयआरबीच्या रस्ते प्रकल्पामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सुरुवातीला टोलनाके बसवून गुंडांची फौज कोल्हापूरमध्ये शिरकाव करीत आहे. खुद्द महालक्ष्मीमेला हा विषय मान्य नाही.
देवदर्शनापूर्वीच दंडाची वसुली केल्यामुळे भाविकांची मने दुखावली जाणार आहेत. याची जाणीव ठेवून आपण सभागृहात टोलरूपी राक्षस व त्याला शहरात आणणारी आयआरबी कंपनी यांना कायमस्वरूपी कोल्हापूरच्या हद्दीतून हद्दपार करण्यासाठी शासनाला भाग पाडावे. करवीरकरांच्या या आक्रोशाला दाद देऊन होऊ घातलेल्या महाराष्ट्रव्यापी दुष्टचक्राला चाप लावावा अन्यथा खासगीकरणाच्या विळख्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र गुरफटला जाण्याचा धोका आहे, असा इशारा निवेदनात दिला आहे. या लोकप्रतिनिधींना आपल्या प्रतिक्रिया ०२३१-२६४४१९१ या फॅक्स क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन निमंत्रक साळोखे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 1:04 am

Web Title: try to speed increase of agitation against toll assessment
टॅग : Increase,Speed
Next Stories
1 जैतापूर अणुवीज प्रकल्पात शिवसेनेची आडकाठी – अजित पवार
2 कोल्हापूरच्या तोतया अन्नभेसळ अधिकाऱ्यांना सांगोल्याजवळ अटक
3 राष्ट्रवादीची जंबो, तरीही अपूर्ण कार्यकारिणी!
Just Now!
X