राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. विद्यापीठाने निर्गमित केलेल्या अधिसूचनेद्वारे संचालित महाविद्यालये व शैक्षणिक विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांत सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची अंतिम मुदत पाच सप्टेंबर होती. ही मुदत उद्या पाच सप्टेंबरला संपुष्टात येत आहे. मात्र, उशिरा जाहीर झालेले निकाल आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची कमतरता लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची मुदत  २० सप्टेंबपर्यंत वाढवण्यात आली आहे. येत्या २० सप्टेंबपर्यंत विना विलंब शुल्कासह आवेदनपत्र स्वीकारण्यात येतील. आवेदनपत्रे एमकेसीएलमार्फत स्वीकारण्यात येणार आहेत.
प्रवेश करण्याची मुदत वाढवल्यामुळे हिवाळी परीक्षांसाठी अर्ज भरण्याची मुदत देखील वाढवण्यात आली आहे. सर्वच्या सर्व अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांच्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने एमकेसीएलद्वारे सादर करण्यास मुदत वाढवण्यात आली असून ती विनाविलंब शुल्कासह २० सप्टेंबर परीक्षेचे अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित महाविद्यालयाने विहित मुदतीच्या आत महाविद्यालयातील नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने २० सप्टेंबपर्यंत भरायचे आहेत. परीक्षेचे आवेदनपत्र देखील एमकेसीएलमार्फत भरावे लागणार असून विद्यार्थ्यांच्या नावाने यादीसह परीक्षा विभागात ही आवेदनपत्रे जमा करायची आहेत. वरील मुदतीत ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र किंवा नामांकनाचे अर्ज आले नाहीत तर पुढील तीन दिवसांमध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या अर्जाच्या छायांकित प्रतीसह संपूर्ण यादी व डीडी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील नामांकन विभागात सादर करावा व सोबतच तातडीने दोन ते तीन दिवसात एमकेसीएलकडील कार्यवाही पूर्ण करावी. कार्यालयाने दिलेल्या सुविधेचे पालन केल्यास संबंधित महाविद्यालयावर नामांकन परीक्षेवर आकारण्यात येणारा विलंबशुल्क घेण्यात येणार नाही. मात्र, महाविद्यालयाने विहित वेळेत ही कार्यवाही पूर्ण न केल्यास विलंब शुल्क आकारले जाईल, असे परीक्षा नियंत्रक यांनी कळवले आहे.