यावर्षी पाऊस कमी असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी आधीच पळालेले असताना, पहिल्या पावसानंतर जंगलात येणाऱ्या रानभाज्यांनाही मोठी मागणी असते. मात्र मागील आठवडय़ापासून ढग जमा होत असले तरी ते बरसत नसल्याने रानातील रानभाज्या तयार होण्यासाठी उशीर लागला आहे. पावसाने अचानक मारलेल्या दडीमुळे आता ग्राहकांना रानभाज्यांसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पहिल्या पावसाच्या जमिनीच्या सुगंधाबरोबरच पावसाच्या थेंबामुळे जमिनीवर हिवळीवर उगवणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांचीही आस ग्राहकांना लागलेली असते. सध्या जंगले उद्ध्वस्त होत असताना शिल्लक असलेल्या जंगलात उगविणाऱ्या या भाज्या आदिवासी वेचून बाजारात आणणात. त्यामुळे पावसाळ्यात आदिवासींनाही थोडासा आर्थिक आधार मिळतो. यामध्ये टाकला, कंठवली, खोपर आदीसह इतरही भाज्या यावेळी मिळतात. मात्र पावसाचेच प्रमाण कमी असल्याने अद्याप भाज्या उगवलेल्या नाहीत अशी माहिती पिरवाडी वाडीतील गैनाबाई या रानभाज्या विक्रेतीने दिली आहे.