अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे येत्या १० व ११ जानेवारी २०१५ ला नागपुरात विदर्भस्तरीय विद्यार्थिनी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात महिलांच्या विविध समस्यांवर ऊहापोह होणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन १० जानेवारीला दुपारी ३ वाजता शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रथम भारतीय विकलांग माऊंट एव्हरेस्ट स्वार महिला अरुणिमा सिन्हा उपस्थित राहणार आहे. उद्घाटनानंतर सायंकाळी सव्वा पाच वाजता सभागृहातून शोभायात्रा काढण्यात येईल. या शोभायात्रेत महाविद्यालयातील जवळपास दोन हजार विद्यार्थिनी सहभागी होणार आहे. या शोभायात्रेचा समारोप चिटणीस पार्कवर होणार आहे. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाच्या स्वागत समिती अध्यक्षा अमृता देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दुसऱ्या दिवशीचा संपूर्ण कार्यक्रम हेडगेवार स्मृती भवनात होणार आहे. सकाळी ९ वाजता पासून विविध विषयावर चर्चा होईल. पत्रकार सरिता कौशिक, अ‍ॅड. तेजस्वीनी खोडे, डॉ. स्मिता कोल्हे या महिलांच्या विविध विषयावर आपले मत मांडणार आहेत. त्यामध्ये ‘नारी तूम युग को नया आधार दो’ आणि ‘नारी सुरक्षा से राष्ट्र सुरक्षा’ या दोन विषयांचा प्रामुख्याने समावेश राहणार आहे. निवासी असलेल्या या संमेलनाला विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ातून महाविद्यालयीन विद्यार्थिनी येणार आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था हेडगेवार स्मृती भवनात करण्यात आली आहे.
 समारोपीय सत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्य़ातील एका प्रतिभावान विद्यार्थिनीचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याचेही अमृता फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.
 पत्रकार परिषदेला स्वागत समितीच्या सचिव मधुबाला साबू, संयोजिका शुभांगी नक्षिणे, अभाविपचे प्रसिद्धी प्रमुख अभिजीत वडनेरे, चंद्रकांत रागीट उपस्थित होते.