पारतंत्र्यात माणसे निर्भय होती. आता ती भयभीत झाली. स्वातंत्र्य सजग असायला हवे. सत्ता ते केव्हाही विकत घेऊ शकते. त्यामुळे स्वातंत्र्याने सत्तेच्या पखाली कधीच वाहायच्या नसतात, असे स्पष्ट मत सासवड येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. िशदे यांनी व्यक्त केले.
मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने रविवारी प्रा. िशदे यांचा सत्कार करण्यात आला. मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दादा गोरे, कार्यवाह कुंडलिक आतकरे, उस्मानाबाद शाखाध्यक्ष नितीन तावडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत आडसूळ यांची उपस्थिती होती. फ. मुं. शिंदे म्हणाले, की कागदावर लिहिण्यापेक्षा काळजावर लिहिणारा लेखक सामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. माणसांना समजून घेणारा, त्यांच्या वेदना स्वत:च्या चिंतनाचा विषय करणारा साहित्यिक धर्म, पंथ, जात, भेद यापलीकडे जाऊन लेखन करतो. आपण जन्माला आल्यानंतर जात आपल्याला अलगद येऊन चिकटते. तिला आपणही आयुष्यभर चिकटून राहायचे का, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला. अंधाराखेरीज उजेडाचे महत्त्व कळत नाही. गांभीर्याची गंगोत्री ही गमतीमधूनच समोर येते. समुद्राच्या खोलीपेक्षा किनारेच माणसाला अधिक साथसंगत करतात. त्यामुळे विनोदभूमीतूनच खरे गांभीर्याचे लेखन होत असल्याचेही ते म्हणाले. उस्मानाबादकरांनी केलेला सत्कार महाराष्ट्राचा प्रातिनिधिक असल्याचे आपण मानतो, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले. आपल्या मिस्कील शैलीतून किस्से, विनोदी कोटय़ा करीत त्यांनी सभागृहाला मनसोक्त हसविले. याच वेळी आपले अभंग, कवितांच्या माध्यमातून सभागृहातील वातावरण धीरगंभीर करीत उपस्थितांना विचारमग्न होण्यास भाग पाडले.
डॉ. गोरे यांनी उस्मानाबादकरांनी केलेला फ.मुं.चा सत्कार अविस्मरणीय असल्याचे सांगितले. कार्यवाह आतकरे यांनी उस्मानाबादची साहित्यिक परंपरा या कार्यक्रमातून पुन्हा समोर आल्याचे म्हटले. आडसूळ यांनी संतश्रेष्ठ गोरोबाकाका ते कुंथलगिरीच्या र्तीथकरांपर्यंत जिल्ह्यास असलेल्या साहित्यपरंपरेचा आढावा घेतला. जिल्ह्यातील साहित्यिकांना म्हणावे असे प्रतिनिधित्त्व अखिल भारतीय वा मराठवाडा साहित्य संमेलनातून दिले जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. रवींद्र केसकर यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती अंधारे यांनी आभार मानले. शहरातील ५०पेक्षा अधिक संस्था, संघटनांच्या वतीने प्रा. िशदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
‘उस्मानाबादचा विचार करू’
नितीन तावडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद उस्मानाबादकरांना मिळावे. जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना, नागरिकांच्या बळावर आम्ही ते आनंदाने पेलू, अशी मागणी केली. त्यावर अखिल भारतीय मराठी महामंडळाचे पदाधिकारी डॉ. गोरे व आतकरे यांनी उस्मानाबादकरांचे संघटन, उत्साह व प्रतिसाद पाहून नजीकच्या काळात अखिल भारतीय संमेलनासाठी उस्मानाबादचा गांभीर्याने विचार करणार असल्याचे स्पष्ट केले.