दुपारी उन-सावलीचा खेळ रंगतो. सायंकाळीही आकाशात पावसाचे वातावरण, आकाशात काळे ढग गर्दी करतात. पाऊस आज पडेल.. उद्या पडेल.. या आशेने गेल्या सहा-सात दिवसांपासून विदर्भातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून मृगधारा बरसण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
मार्च-एप्रिल आणि जूनच्या पहिल्या आठवडय़ात प्रखर उन्हामध्ये अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवलेले आहे. रोहिणीपाठोपाठ मृगही कोरडा चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. गेल्या महिन्यात वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. उन्हाळ्यात पाऊस झाला. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर पाऊस नसल्यामुळे विदर्भात पिकांची पेरणी लांबणीवर पडत आहे.
गेल्या महिन्याताील पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शतीतातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज घोषित केले होते मात्र, त्या पॅकेजची अंमलबजावणी झाल्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहोचलेला नाही. त्यामुळे आधीच चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज घेतल्यामुळे  त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली. त्यामुळे त्यातूनही सावरत काही शेतकऱ्यांनी मृगक्षत्राच्या आधी शेतीमध्ये धूळपेरणी केली. मृगनक्षत्र लागल्यानंतर आज येईल, उद्या येईल अशी चातकासारखी पावसाची वाट पाहात शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. अद्यापि विदर्भामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जिल्ह्य़ात अद्याप पेरणी सुरू झालेली नसल्याने यंदाच्या खरिपावरच काळजीचे सावट पसरले आहे.
राज्य सरकारने खत आणि बी बियाणे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून दिले असले तरी पाऊस नाही. अनेकांच्या शेतामधील विहिरींना पेरणीला पुरक इतके पाणी नाही त्यामुळे निसर्गाने दया करावी अशी आस लावून पावसांची वाट पाहात शेतकरी बसला आहे. जिल्हयातील काही गावांमध्ये उत्साह नाही. खेडय़ापाडय़ात या दिवसात पेरणीची लगबग असते. या वेळी मात्र ती कोठेच दिसत नाही. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवडय़ात पावसाने सर्वत्र हजेरी लावलेली असते. काही शेतकऱ्यांनी ओलिताखाली कापूस केलेला असला तरीही कोरडवाहू शेतकऱ्यांची कापसाची लागवड राहिली आहे. वातावरण ढगाळ असले तरीही पाऊस येत नसल्याने शेतकरी हबकून गेला आहे. पावसाची वाट पाहणेही दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.  दररोजच आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना खरिपाच्या धास्तीने पुरते हताश करून टाकले आहे.