लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले असताना जुलै महिन्यात होणाऱ्या पदवीधर मतदारसंघासाठी भाजपतर्फे कोण उमेदवार राहील, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व गेल्या दोन महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. आता निवडणुकीचा अंतिम टप्पा आटोपला असून निकालाच्या आधी किंवा लगेच उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १० ते १९ जुलैदरम्यान होण्याची शक्यता असून त्यासाठी नितीन गडकरींचा वारसदार, भाजपचा उमेदवार म्हणून महापौर अनिल सोले, माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी आणि पक्षाचे पदाधिकारी संजय भेंडे यांच्या नावांची चर्चा आहे. पक्षाच्या प्रमुख शहर पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून त्यात अनिल सोले, संदीप जोशी आणि संजय भेंडे यांच्या नावांवर चर्चा झाली. संदीप जोशी आणि अनिल सोले यांचे नाव सध्या आघाडीवर असले तरी वेळेवर संजय भेंडे यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
लोकसभा निवडणुकचे निकाल घोषित होताच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश बैठकीच्या दरम्यान देण्यात आले. नितीन गडकरी ठरवतील तोच उमेदवार राहील असे जरी असले तरी संदीप जोशी हे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आणि युवकांमध्ये लोकप्रिय असल्याचे बोलले जात आहे. अनिल सोले यांच्या नावाची चर्चा असून त्यांनी कार्यकत्यार्ंना कामाला लागा, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून प्राचार्य बबनराव तायवाडे आणि माजी प्रशासकीय अधिकारी किशोर गजभिये यांचे नाव आधीच जाहीर करण्यात आल्यामुळे या ठिकाणी बहुजन उमेदवार असावा असा पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे त्यामुळे संजय भेंडे यांचे नाव समोर येण्याची शक्यता आहे. संजय भंडे यांना उमेदवारी दिली तर फडणवीस गट नाराज होऊ शकतो. त्यामुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यासमोर मोठी कसरत आहे. आगामी विधानसभा निवडणुका बघता गडकरी यांचा बहुजन उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. नेमका तो कोण आहे हे मात्र अजून बाहेर आले नाही. थोडे दिवस वाट पाहा असे कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे.  
नितीन गडकरी यांच्या सलग चारवेळा निवडून येण्यामुळे सर्वपरिचित झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची येती निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जो कोणी उमेदवार देण्यात येणार आहे तो सक्षम राहील, असे यापूर्वीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व इतर ज्येष्ठ नेत्यांनी जाहीर केले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने पूर्ण तयारी झाली असल्याचा दावा भाजपतर्फे केला जात असून केवळ उमेदवाराचे नाव घोषित होण्याची कार्यकर्ते वाट पहात आहेत. पदवीधर मतदारसंघासाठीचा उमेदवार हा नितीन गडकरी यांच्या पसंतीचाच राहील हे स्पष्ट असले तरी बहुजन आहे की दुसरा कोणी, या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही धुक्याआड आहे.