पतीने दुसरे लग्न करून घरात सवत आणल्याचा वचपा काढण्यासाठी पती, सवत व सासूला विष देऊन ठार मारणाऱ्या महिलेला जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सालेकसा तालुक्याच्या लभानधारणी येथील एका महिलेने आपल्या सवतीचा व नवऱ्याचा काटा काढण्यासाठी त्यांच्या जेवणात विष कालवले. ही घटना १४ जून २०११ रोजी घडली होती. आरोपी सुनीता भामेश्वर दिहारी (३०) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
ही महिला लग्न झाल्यापासून नवऱ्याच्या मागे कटकट करायची. कंटाळलेल्या भामेश्वरने घटनेच्या दीड महिन्यापूर्वी गावातीलच अन्नपूर्णा कोवे हिच्याशी पुनर्विवाह केला होता. त्यामुळे सुनीता आणखीनच चिडली होती. माहेरी पंचमटोला येथे काही दिवस घालवल्यानंतर घटनेच्या १५ दिवसाआधी सुनीता लभानधारणी येथे आली. १४ जून २०११ ला आरोपी सुनीताला स्वयंपाक करण्याचा योग आला. याचा फायदा घेऊन तिने वांगी व मासोळीची भाजी तयार केली. घरातील सर्व मंडळी शेतावर गेले असल्याने याचा फायदा घेऊन तिने जेवणात विष कालवले. दुपारी शेतावर गेलेली सर्व मंडळी घरी परतली. सवत अन्नपूर्णा, पती भामेश्वर, सासू सागनबाई व पुतणी कमला यांना तिने जेवण वाढले. जेवणानंतर अन्नपूर्णा दिहारी (२२), भामेश्वर दिहारी (३०), सागनबाई दिहारी (७०) यांचा मृत्यू झाला होता. या घटनेतून कमला बचावली.
या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी करून प्रकरण न्यायालयात दाखल केले. या प्रकरणावर मंगळवारी जिल्हा सत्र न्यायाधीश ए.सी. चाफले यांनी निर्णय दिला.
यात त्यांनी आरोपी सुनीता दिहारी हिला जन्मठेपेची शिक्षा व ५०० रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली. या प्रकरणात फिर्यादीची बाजू  सरकारी वकील अ‍ॅड़ कैलास खंडेलवाल यांनी मांडली.