तिकीट रांगांसमोरील गर्दीचा विचार करून प्रवाशांना तिकीट काढण्याचे विविध पर्याय देणाऱ्या मध्य रेल्वेने आता महिलांसाठीही खास विचार सुरू केला आहे. महिनाभरापूर्वी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे ‘महिला विशेष’ तिकीट खिडकी सुरू करणाऱ्या मध्य रेल्वेने या खिडकीला मिळालेला महिलांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या खिडकीचा विस्तार इतर उपनगरीय स्थानकांत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून ठाणे आणि कल्याण या गर्दीच्या स्थानकांत महिलांसाठी अशी राखीव खिडकी सुरू करण्यात आली आहे. तिकीट खिडक्यांवरील रांगांपासून महिलांची सुटका करण्याच्या विचाराने मध्य रेल्वेने १२ नोव्हेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर महिलांसाठी एक तिकीट खिडकी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या खिडकीला महिलांचा खूपच उत्तम प्रतिसाद लाभला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास मध्य रेल्वेमार्गावरील इतरही स्थानकांवर महिलांसाठी तिकीट खिडकी राखीव ठेवण्यात येईल, असे त्या वेळी मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले होते.याच धर्तीवर आता कल्याण आणि ठाणे या दोन महत्त्वाच्या स्थानकांमध्येही पश्चिमेकडे महिलांसाठी एक तिकीट खिडकी राखीव ठेवण्यात आली आहे. ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकजवळील नवीन तिकीटगृहातील एक खिडकी आणि कल्याण पश्चिमेकडील आठव्या क्रमांकाची खिडकी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
ठाणे आणि कल्याण स्थानकांतून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. विशेषत: रविवारी या स्थानकांवरील तिकीट खिडक्यांसमोरील रांगा ओसंडून वाहत असतात. त्यात महिलांना दिलासा देण्यासाठी अखेर हा निर्णय घेतल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील तिकीट खिडकी दोन पाळ्यांमध्ये चालू होती. यातील पहिली पाळी सकाळी सात ते दुपारी तीन अशी होती. या दरम्यान सरासरी ८५० महिलांनी या खिडकीचा लाभ घेतला. तर दुपारी तीन ते रात्री अकरा या वेळेत असलेल्या दुसऱ्या पाळीदरम्यान सरासरी ११५० तिकिटांची विक्री झाली. एखाद्या तिकीट खिडकीचे यशापयश जोखण्यासाठी त्या खिडकीवर एका पाळीदरम्यान १२०० ते १४०० तिकिटे विकली गेली पाहिजेत, असा निकष आहे. सध्या हा निकष पूर्ण होत नसला, तरीही तिकीट विक्रीची संख्या लक्षणीय आहे.हा विचार करून आता दोन पाळ्यांऐवजी महिलांच्या गर्दीच्या वेळेचा विचार करून राखीव तिकीट खिडकी सकाळी दहा ते रात्री आठ या एकाच पाळीत सुरू ठेवता येईल का, याबाबतही रेल्वे प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे. ठाणे आणि  कल्याण येथे सुरू केलेली ही महिला विशेष तिकीट खिडकी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादाचा विचार करून इतर स्थानकांवर ही योजना कशी सुरू करता येईल,