महापालिका क्षेत्रात नव्याने बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक इमारती या पर्यावरणपुरक व कमीत कमी ऊर्जेचा वापर करणाऱ्या असाव्यात. महापालिके ने याकरिता प्रयत्न करावे, या दृष्टीने महापालिका अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्यावतीने ‘एनर्जी कंजर्वेशन बिल्डींग कोड’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
राज्यात सर्व महापालिकांमध्ये अशा कार्यशाळांचे आयोजन ‘महाऊर्जा’च्या वतीने करण्यात येणार असून नागपूरपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. नैवेद्यम सभागृहात आयोजित या कार्यशाळेला विभागीय आयुकत अनुप कुमार, महाऊर्जाचे प्रवीण दराडे, इंडियन इन्स्टिय़ूूट ऑफ आर्किटेक्टचे परमजीतसिंग आहुजा, नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार व नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना अनुप कुमार म्हणाले की, आपले ऊर्जेचे नैसर्गिक स्रोत कमी होत आहेत.  इमारत बांधकामाच्या चुकीच्या पद्धती व आपली जीवनशैली यामुळे आपण ऊर्जा संसाधनांवरील भार वाढवत आहोत. संसाधनांच्या पुनर्वापर व पुनर्चक्रीकरणासंबंधी जागृती सर्वस्तरावर होणे आवश्यक आहे.
 एनर्जी कंजर्वेशन बिल्डींग कोडमुळे पर्यावरणपूरक इमारत बांधकामाचे सर्व निकष बदलले असून वास्तुविशारदांना अनेक संकल्पनांचा नव्याने विचार करावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे येणा-या काळात देशभर मोठय़ा प्रमाणात बांधकामे होणार असून यामध्ये ऊर्जेचा योग्य वापर कसा करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे, असे परमजीतसिंग आहुजा यांनी सांगितले. महाऊर्जाच्या वतीने एनर्जी कंजर्वेशन बिल्डींग कोडबाबत विस्तृत आराखडा तयार करण्यात येत असून महापालिका क्षेत्रातील नवीन व्यावसायिक इमारतींना ऊर्जा संवर्धनाचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे, असे दराडे यांना सांगितले.
ऊर्जा संवर्धन व बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी निरनिराळया विषयांवर यावेळी मार्गदर्शन केले. महाऊर्जाचे व्यवस्थापक हेमंत पाटील यांनी प्रास्ताविक व आभार मानले. नागपूर महापालिका व नासुप्रमधील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.