ठाणे, कळवा, मुंब्रा या तीन शहरांमधील प्रवाशांसाठी दळणवळणाचा मुख्य स्रोत असणाऱ्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा गाडा (टीएमटी) दिवसेंदिवस खोलात जात असून उपक्रमाच्या ताफ्यातील सुमारे १०० बसेस नादुरुस्त अवस्थेत आगारात उभ्या असल्याने नव्या बसेस दाखल होत नाहीत, तोवर ठाणेकर प्रवाशांना बस थांब्यावर ताटकळत राहण्याशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय नसल्याचे चित्र दिसत आहे.
‘टीएमटी’च्या ताफ्यात एकूण ३१३ बसेस असून त्यापैकी जेमतेम २०० ते २०७ बसेस आगाराबाहेर पडतात. प्रवाशांना अधिकाधिक बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी उपक्रमाने २५ बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. त्यापैकी जेमतेम १३ बसेस रोज मार्गावर उपलब्ध असतात. १०० पेक्षा अधिक बसेस आगाराबाहेर पडतच नाहीत आणि त्यापैकी अध्र्याहून अधिक बसेस भंगारात निघाल्या आहेत. त्यामुळे ‘टीएमटी’कडून जलद आणि नियमित सेवेची अपेक्षा बाळगणे सध्यातरी हास्यास्पद ठरणार आहे.
ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी ठाणेकरांना मोठय़ा प्रमाणावर ‘टीएमटी’ बससेवेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या सेवेच्या सक्षमीकरणाच्या वेगवेगळ्या घोषणा यापूर्वीही झाल्या आहेत. आर. ए. राजीव यांच्या आयुक्तपदाच्या काळात त्यांनी ‘टीएमटी’च्या अधिकाधिक बसेस वेगवेगळ्या मार्गावर धावाव्यात यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे २०० पेक्षा अधिक बसेस आगाराबाहेर पडू लागल्या. मात्र, राजीव यांच्या प्रयत्नांनंतरही हा आकडा २०० ते २१० बसेसच्या आसपास असून तो वाढविणे अद्याप प्रशासनाला जमलेले नाही. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने नव्या वर्षांचे आर्थिक अंदाजपत्रक सादर करताना नव्या घोषणांचा रतीब मांडला असला तरी १०० पेक्षा जास्त बसेस दररोज आगाराबाहेर पडत नाहीत, अशी कबुली दिली आहे. ‘टीएमटी’च्या ताफ्यात सध्याच्या घडीस सीएनजीवर धावणाऱ्या १२८ बसेस असून १८५ बसेस या डिझेलवर धावतात.
याशिवाय २५ बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. या बसेसच्या संचालनासाठी ८१५ चालक तसेच ९६६ वाहक असा कर्मचारी वर्ग उपक्रमाकडे आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी असली तरी बसेसची दुरवस्था झाल्याने त्या आगाराबाहेर काढणे शक्यच नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
नव्या बसेसची खरेदी
नादुरुस्त आणि भंगारात निघालेल्या बसेसमुळे येत्या आर्थिक वर्षांत २३० नव्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. या बसखरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी २० टक्के निधी महापालिका उभारणार असून त्यासाठी कमी व्याजदराचे कर्ज कोठून उपलब्ध होते, याचा अभ्यास केला जात आहे. या बसेसच्या संचालनासाठी कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. या बसेस उपलब्ध झाल्यानंतर ठाणेकरांना नियमित बससेवा पुरविता येईल, असा दावा केला जात असला तरी सध्या आगारांमध्ये उभ्या असणाऱ्या बसेस बाहेर काढण्यात कोणत्या अडचणी आहेत, याविषयीचे स्पष्टीकरण मात्र व्यवस्थापनाला देता आलेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
१०० बसेसची विश्रांती ठाणेकरांसाठी तापदायक
ठाणे, कळवा, मुंब्रा या तीन शहरांमधील प्रवाशांसाठी दळणवळणाचा मुख्य स्रोत असणाऱ्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा गाडा (टीएमटी) दिवसेंदिवस खोलात जात असून उपक्रमाच्या
First published on: 07-02-2014 at 02:09 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 100 bus rest troubles thane people