जिल्ह्य़ातील ग्रामीण व दुर्गम भागात तातडीच्या वैद्यकीय सेवांची उपलब्धता करण्याची जबाबदारी असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात सद्य:स्थितीत १०० पदे रिक्त असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्य़ात आदिवासी व बिगरआदिवासी भागात एकूण ६८० आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. त्यात आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांची संख्या सर्वाधिक आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत तातडीची वैद्यकीय सेवा, बाह्य़रुग्ण कक्ष, सहा खाटांचे आंतररुग्ण कक्ष, कुटुंबकल्याण स्त्री शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा सेवांबरोबर विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, उपकेंद्रामार्फत रुग्णावर उपचार या आरोग्य सेवा दिल्या जातात. प्रत्येक आरोग्य केंद्रात १५ कर्मचारी कार्यरत असणे अभिप्रेत आहे. त्यातील स्वच्छता व वाहन सेवा कंत्राटी पद्धतीने देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत चालणाऱ्या या व्यवस्थेसाठी आरोग्य विभाग अनुदानापोटी मोठी रक्कम खर्च करते. तथापि, प्रत्यक्षात केंद्र व उपकेंद्र यांचा रुग्णांना कितपत लाभ होतो, हा प्रश्नच आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र असो किंवा उपकेंद्र, उपचाराऐवजी रुग्णांना सरळ ग्रामीण अथवा जिल्हा रुग्णालयाचा रस्ता दाखविणे हे कर्तव्य अनेक ठिकाणी पार पाडले जात असल्याचा आक्षेप वारंवार घेतला जातो. जिल्ह्य़ाचा विचार करता आदिवासी भागात ५२, तर बिगरआदिवासी भागात ५१ अशी एकूण १०३ आरोग्य केंद्रे आहेत.
उपकेंद्रांची संख्या अनुक्रमे ३०० आणि २७७ अशी एकूण ५७७ च्या घरात आहे. आरोग्य सेवक, सेविका, साहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व साहाय्यक तंत्रज्ञ आदी नऊ गटांत जिल्ह्य़ात एकूण १४३८ पदे मंजूर आहेत. त्यातील १३३८ पदांवर कर्मचारी नियुक्त असले तरी १०० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या अहवालावरून ही बाब उघड झाली आहे. आरोग्य केंद्रांच्या कारभारावर कोणी बोट ठेवल्यास कार्यरत घटक रिक्त पदांचा विषय पुढे करतात.
मनुष्यबळाअभावी काही केंद्राचे कामकाज मंदावल्याचे दिसत आहे. जिल्ह्य़ात आरोग्य सेविकांची ५८ पदे रिक्त आहेत. त्या खालोखाल महिला आरोग्य साहाय्यक २४ व पुरुष ४, आरोग्य सेवक ९, औषध निर्माण अधिकारी २ आणि अन्य गटांतील तीन पदे रिक्त आहेत. केवळ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि साहाय्यक या गटातील अनुक्रमे ५३ व १० ही पदे मंजुरीनुसार संपूर्ण क्षमतेने भरलेली आहेत.
उपकेंद्रांमार्फत प्रथमोपचार, प्रसूतीपूर्व मातांची तपासणी व किरकोळ आजारांवर औषधोपचार, माता-बाल संगोपनविषयक सल्ला व सेवा, क्षयरोग, कुष्ठरोग व हिवतापाच्या रुग्णांना उपचार व संदर्भ सेवा, आरोग्य शिक्षण आदी सेवा पुरविल्या जातात. प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य सेवक तसेच अंशकालीन स्त्री परिचर अशा तीन पदांना शासनाची मान्यता आहे. जिल्ह्य़ातील रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने त्याचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे.