पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेस शासनाच्या वैशिष्टय़पूर्ण विशेष अनुदान योजनेतून शहर विकासासाठी १८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती, नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी दिली. या निधीतून नागरिकांना भेडसावणाऱ्या रस्ते, गटर्स, फूटपाथची कामे मार्गी लागतील. यात दलित वस्ती सुधारणा, शहरातील रस्ते दुरुस्ती, नूतनीकरण, आकर्षक फूटपाथ, हिंदू स्मशानभूमी, आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम, आमदार जयकुमार गोरे व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आनंदराव पाटील यांचे व मुख्याधिकारी आशा राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे कऱ्हाडकर यांनी सांगितले.