राज्यातील १०३ सहकारी व ५२ खासगी अशा एकूण १५५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत १९७.९९ लाख मे. टन उसाचे गाळप करून १९.८० लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. यात साखरेचा सरासरी उतारा १० टक्के एवढा मिळाला आहे.
सर्वाधिक ५१ साखर कारखाने चालू असलेल्या पुणे विभागात आतापर्यंत ८३.७४ लाख मे. टन उसाचे गाळप करून ८.५२ लाख मे. टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. यात साखर उतारा १०.१७ टक्के एवढा मिळाला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात-अमरावती विभागात सर्वात कमी म्हणजे दोन साखर कारखान्यांनी ०.९३ लाख मे.टन ऊसगाळप करून ०.०७ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांचा साखर उतारा ७.९४ टक्के मिळाल्याचे दिसून आले.
पुणे विभागात (पुणे, सोलापूर व सातारा) ३१ सहकारी व २० खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. कोल्हापूर विभागात (कोल्हापूर व सांगली) २७ सहकारी व ४ खासगी अशा ३१ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३६.३८ लाख मे. टन उसाचे गाळप करून ३.९५ लाख मे. टन साखरेचे उत्पादन घेताना सर्वाधिक १०.८५ टक्के उतारा मिळविला आहे. अहमदनगर विभागात (नगर व नाशिक) यंदा १७ सहकारी व ७ खासगी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून यात २९.०५ लाख मे. टन उसाचे गाळप होऊन ९.५७ टक्के सरासरी उताऱ्याने २.७८ लाख मे. टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे.
औरंगाबाद विभागात (औरंगाबादसह जालना, बीड, धुळे, नंदूरबार,जळगाव) सध्या ११ सहकारी तर ५ खासगी साखर कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांनी १६.७६ लाख मे.टन उसाचे गाळप करून सरासरी ९.०४ टक्के उतारा मिळवीत १.५२ लाख टन साखर तयार केली आहे. तर नांदेड विभागात (नांदेड, उस्मानाबाद व लातूर) १६ सहकारी व १२ खासगी साखर कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांमध्ये २९.८१ लाख मे.टन उसाचे गाळप होऊन ९.५९ टक्के सरासरी उतारा घेत २.८६ लाख मे.टन साखरेचे उत्पादन केले आहे. अमरावती विभागात एक सहकारी व एक खासगी असे दोन साखर कारखाने सुरू आहेत. या माध्यमातून ०.९३ लाख मे.टन उसाचे गाळप होऊन ७.९४ टक्के सरासरी उतारा मिळवित ०.०७ लाख मे. टनाएवढी साखर तयार करता आली. तर नागपूर विभागात सुरू असलेल्या तीन खासगी कारखान्यांनी १.३२ लाख मे. टन उसाचे गाळप करून केवळ ०.१० लाख मे.टन साखरेचे उत्पादन घेतले. यात सरासरी साखर उतारा ७.६६ टक्के एवढा मिळाला आहे.
गतवर्षीच्या गळीत हंगामात राज्यात ११७ सहकारी व ४८ खासगी साखर कारखाने सुरू होते. त्या वेळी १६५ लाख मे. टन ऊस गाळप करून सरासरी १०.०२ साखर उताऱ्याने एकूण १९.०४ लाख मे.टन साखरचे उत्पादन घेण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेने यंदाच्या गळीत हंगामात १४ सहकारी साखर कारखान्यांची संख्या घटली तर खासगी कारखान्यांची संख्या ४ ने वाढली आहे. तर ऊसगाळप ७.९४ लाख मे. टनाने वाढले आहे. त्यामुळे साहजिकच साखरेचे उत्पादन ७.९४ लाख मे. टन तर साखरेचे उत्पादन ०.७६ लाख मे. टनाने वाढल्याचे दिसून येते. मात्र साखर उताऱ्यात ०.०२ टक्क्य़ांनी घट झाली आहे.