दुष्काळ व भीषण पाणीटंचाईची सर्वात मोठी झळ वन्यप्राण्यांना सोसावी लागत आहे. केवळ महिन्याभरातच बुलढाणा जिल्ह्य़ातील प्रादेशिक व राखीव वनक्षेत्रातील वीसहून अधिक वन्यप्राण्यांचा अन्नपाण्यावाचून तडफडून मृत्यू झाला. या भयावह परिस्थितीत वन्यजीवांच्या प्राणांचे संरक्षण करण्यास प्रादेशिक वनविभाग व वन्यजीव विभाग अपयशी ठरला आहे.
दुष्काळामुळे प्रादेशिक व राखीव जंगलांमध्ये अन्न व पाण्याची मारामार आहे. त्यामुळे वन्यप्राणी सैरभर झाले आहेत. ते अन्न व पाण्यासाठी कासावीस होऊन गावोगावच्या नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्य़ातील सात प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील एकूण १४४ पाणवठे कोरडे पडले आहेत. या पाणवठय़ांवर वनविभागाने कोटय़वधी रुपये खर्च केला तरी देखील हे पाणवठे कोरडे असून कुचकामी झाले आहेत. त्यामुळे या कामावरील कोटय़वधीचा खर्च वाया गेला आहे. या पाणवठय़ांचा पुनर्वापर करण्याचे कुठलेही नियोजन वनविभागाने केले नाही. या पाणवठय़ांमध्ये प्लास्टिक कापड अंथरूण त्यात टॅंकर्सद्वारे कृत्रिम पाणीपुरवठा करता आला असता, मात्र असे कुठलेही ठोस पूर्वनियोजन वनविभागाने केले नसल्याने आता वन्यप्राणी अन्नपाण्यासाठी गावांकडे धाव घेत आहेत. या महिन्याभरातच अन्नपाण्यावाचून तडफडून २० वन्यप्राण्यांना प्राण गमवावा लागला. एवढे भयंकर आक्रित घडत असतांना बुलढाणा वनविभागाच्या कुंभकर्णी झोपा अजूनही उडालेल्या नाहीत. वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा जीवघेणा संघर्ष सुरू असतांना त्यांच्या उग्र रूपाने नागरी जीवनही धोक्यात आले आहे. या वन्यप्राण्यांनी पशु व नागरिकांवर ९७ हून अधिक हल्ले केले. त्यात एका इसमाचा मृत्यू झाला. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा, गुराढोरांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
उन्हाळ्यात तेंदूपत्ता व डिंक गोळा करण्याचा हंगाम असतो. त्यासह गुराढोरांच्या अजनीपालासारख्या वैरणासाठी शेतकरी-शेतमजूर मोठय़ा प्रमाणावर जंगलात जातात. त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणावर वन्यप्राण्यांचे हल्ले होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. वनखात्याने याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असतांना संपूर्ण वनखाते कोटय़वधी रुपयांची विविध योजनांची बोगस बिले काढण्यात दंग आहे. या खात्याची मार्च अखेरीसच्या हिशेबांची जुळवाजुळव सुरू आहे. मार्च एन्डिंग व खासगी साग वृक्षतोडीला या खात्याने अग्रक्रम दिल्याने वन्यजीव व नागरिकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाकडे पाहण्यास या विभागास वेळ नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
यासंदर्भात वनखात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क केला असता महिन्याभरात २० वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचे त्याने मान्य केले. सुमारे १४४ वनपाणवठे कोरडे झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली, मात्र सर्व परिक्षेत्रातील पाणवठय़ानजीक विंधन विहिरी घेऊन त्यातील पाणी पाणवठय़ात सोडण्याचा प्रयत्न असल्याचे तो म्हणाला. या कामासाठी सातही वनपरिक्षेत्रासाठी लाखो रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार विंधन विहिरी घेण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे, मात्र या विंधन विहिरींना पाणी न लागल्यास टॅंकरशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. विंधन विहिरी घेण्याऐवजी सरळ टॅंकरच का लावत नाही, यावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. एकूणच वनविभागाचा तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार दिसून येत आहे.