जामीन काळात आणखी दोघींवर अत्याचार
वृद्धेवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्य़ात जामीन मिळाल्यानंतर पुन्हा दोन प्रौढ महिलांवर बलात्कार करणाऱ्या विकृत तरुणास न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची व २० हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. पोलिसांनी एकच गुन्हा म्हणुन नोंद केलेल्या या खटल्यातील, दोन स्वतंत्र अत्याचाराच्या घटनांत प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. या दोन्ही शिक्षा स्वतंत्र भोगायच्या आहेत.
गुणवडी (ता. नगर) गावात घडलेल्या या खटल्याचा निकाल आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी दिला. सरकारतर्फे सरकारी वकिल गोरख मुसळे यांनी काम पाहिले. विजय उर्फ अजय मुरलीधर दळवी (वय ३३, रा. गुणवडी, नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. वृद्धेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुनही त्याला पुर्वी ७ वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. याच गुन्ह्य़ात त्याला जामीन मिळाल्यानंतर त्याने गावातील दोन प्रौढ महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप होता. दळवी हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी एकच गुन्हा नोंदवला असला तरी दोन स्वतंत्र गुन्हे केले असल्याने त्याला स्वतंत्र व जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिल मुसळे यांनी केली होती.
दळवी याने गुणवडी गावात ९ ऑगस्ट २०११ च्या रात्री १० वाजता व मध्यरात्री १ ते २ च्या सुमरास दोन महिलांवर बलात्कार केल्याची फिर्याद नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या खटल्यात एकुण १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती सरदेसाई यांनी गुन्ह्य़ाची कागदपत्रे व्यवस्थीत सादर न करता, गुन्ह्य़ाचे गांभीर्य कमी केल्याचा प्रयत्न केल्याने या चुकीचा परिणाम शिक्षा देण्यावर होऊ नये, तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस काढावी, अशी मागणी मुसळे यांनी न्यायालयास केली होती. दळवी हा खासगी वाहनावर चालक म्हणुन काम करत होता.