साडेतीन महिन्यांत तब्बल २७ खून! बीड जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्थेचे असे धिंडवडे निघत असताना पोलिसांच्या कारभाराची अब्रूही चव्हाटय़ावर आली आहे. वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचेच ही आकडेवारी सांगते.
अवघ्या १९ हजारांसाठी लक्ष्मण नारायण सिंग याने झोपेत असलेल्या दोन तरुणांना पोकलेनच्या दातऱ्याने जिवे मारून पुरून टाकले. वीस वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी कुंभारीचे माजी सरपंच उद्धव सुरवसे यांचा भरदिवसा पाठलाग करून रस्त्यावरच निर्घृण खून करण्यात आला. अंबाजोगाईतही जन्मदात्यानेच मुलाचा खून केल्याची दुर्दैवी घटना उघड झाली.
बीड जिल्ह्य़ात जानेवारी ते एप्रिल दरम्यान साडेतीन महिन्यांत विविध घटनांमध्ये तब्बल २७ खून झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.
अत्यंत छोटी रक्कम, किरकोळ कारण व बदला अशा कारणाने थंड डोक्याने खून झाल्याने आरोपींची मानसिकता या निमित्ताने समोर आली आहे.
जानेवारीच्या सुरुवातीलाच परळी तालुक्यातील सारडगाव येथे अनैतिक संबंधातून जन्मलेले अर्भक फेकून दिल्याप्रकरणी जोडप्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि पोलीस दप्तरी खुनाचे गुन्हे दाखल नोंद होण्याची मालिकाच सुरू झाली.
याच महिन्यात धारूर आगारातील बसचालक खय्युम कादरी यांचा खून झाला. अंबाजोगाई तालुक्यातील वाडलेवाडी येथील वृद्धाचाही किरकोळ कारणावरून मारहाणीत मृत्यू  झाला.
केज तालुक्यातील होळ येथे तर मुलीच्या कंपासमध्ये चिठ्ठी का टाकली, असे विचारण्यास गेलेल्या पित्यावरच तलवारीने वार करून जिवे मारण्यात आले. फेब्रुवारीमध्ये सिरसाळा (तालुका परळी) येथे वीटभट्टीचालक शेख इब्राहिम कुरेशी व पंचायत समिती सदस्य सय्यद निसार पट्टेदार या दोघांचा खून झाला.
मार्चच्या सुरुवातीलाच परळीत छातीत बुक्का घालून जीपचालकाचा खून झाला. आष्टीतील मातकुळ येथे अनैतिक संबंधातून एकाला विष पाजून जिवे मारण्यात आले. केज तालुक्यातील कोरेगावात विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. बीड तालुक्यातील केसापुरी येथे जमिनीच्या वादातून साक्षीदारालाच ठार केले.
वीस वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला म्हणून १९ मार्चला कुंभारीचे माजी सरपंच उद्धव सुरवसे यांचा पाठलाग करून भरदिवसा खून करण्यात आला. धारूर तालुक्यातील बोरफडी येथे माजी सरपंच बाळासाहेब गडदे यांनाही जुन्या वादातून जिवे मारले.
घोसापुरी शिवारात २५ मार्चला बिहारी बाबू लक्ष्मण नारायण सिंग याने केवळ १९ हजार रुपयांसाठी दोन तरुणांना झोपेतच पोकलेनच्या दात्र्याने मारून पुरून टाकून पसार झाला.
वडवणी तालुक्यातील लक्ष्मीपूर येथे भाऊ व पुतण्यानेच रेशन दुकानदार श्रीमंत शेषेराव सवासे यांचा खून केला. अंबाजोगाई तालुक्यातील शिवारात राजाभाऊ शिवाजी ठोंबरे याचा खून झाला. हा खून त्याच्या जन्मदात्यानेच केल्याचे तपासात उघड झाले.
एप्रिल महिन्यात युसूफ वडगावजवळ अप्पेगाव येथे पैशाच्या कारणावरून एकाचा खून केला गेला, तर बक्करवाडीत जावयानेच सासऱ्याचा कु ऱ्हाडीचे घाव घालून ठार केले.
धारूर तालुक्यात सुरणवाडी येथे एका तरुणाचा खून करून मृतदेह नदीत फेकण्यात आले. गेवराईत निपाणीजवळका येथे मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. अशा साडेतीन महिन्यांत तब्बल २७ खुनांच्या मालिकेने जिल्हा हादरून गेला.