वडगाव ग्रामपंचायतलगत सुभाष क्रीडा मंडळाच्या आखाडय़ात सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर विशेष पथकाने छापा टाकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह २७ जणांना अटक केली. जिल्हा विशेष पथकाने १० ऑगस्टला मध्यरात्री ही कारवाई करून जुगाऱ्यांकडून ६ लाख रुपये रोख व साहित्य जप्त केले.
पंचायत समिती सभापतीचे यजमान व राष्ट्रवादीचे पदाधिकारी संजय लंगोटेंसह २७ जण तेथे सापडले. वडगाव ग्रामपंचायतीलगत सुभाष क्रीडा मंडळाचा आखाडा आहे. याच इमारतीच्या पहिल्या माळ्यावर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हा विशेष पथकाला मिळाली होती. त्यावरून परिविक्षाधीन उपपोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वाखाली रात्री ११ वाजताच्या सुमारास या जुगारावर छापा टाकण्यात आला. यावेळी सर्व २७ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून ५ लाख ८६ हजार ३६० रुपये, ५२ पत्ते व साहित्य जप्त केले. ही कारवाई परिविक्षाधीन उपपोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू वटाणे, पोलीस उपनिरीक्षक सुगत पुंडगे, जमादार विजय डवले, भीमराव सिरसाठ, विशाल भगत, भोजराज कपरते, रितुराज मेंढवे, प्रवीण गौरखेडे, प्रमोद मडावी, मोहम्मद साजीद, मयुरी मांगुळकर यांनी केली.