औरंगाबाद येथील एसपीआय म्हणजे ‘सव्‍‌र्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिटय़ूट’ या संस्थेच्या जून २०१४ मध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्ता यादीत येथील सुदर्शन अकादमीच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुढील दोन वर्षे या विद्यार्थ्यांची या केंद्रात उच्च माध्यमिकच्या अभ्यासाबरोबरच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेतली
जाणार आहे.
एनडीएमध्ये मराठी टक्का वाढावा या उद्देशाने १९७७ मध्ये महाराष्ट्र शासनाने सव्‍‌र्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिटय़ूट ही संस्था औरंगाबाद येथे सुरू केली. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक अधिकारी दिले आहेत. उज्ज्वल यशाची परंपरा असलेल्या या संस्थेमध्ये प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असते. येथील प्रवेशासाठी इ. १० वीचे विद्यार्थी पात्र असतात. २०१४-१५-१६ च्या शैक्षणिक वर्षांसाठी या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात नाशिकमधील सुदर्शन अकादमीच्या ओंकार कुलकर्णी, क्रिष्णा वर्पे व शुभम वराडे यांचा समावेश आहे. ओंकार हा राजीवनगरचा रहिवासी असून नाशिक केंब्रिज शाळेचा विद्यार्थी आहे. ओंकारची आई शिल्पा कुलकर्णी या नाशिकमध्ये एका जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीत मानवी संसाधन प्रबंधक आहेत. ओंकारला लहानपणापासूनच वैमानिक होण्याची इच्छा आहे. आयोबा विंग कमांडर अविनाश चिकटे हे भारतीय हवाईदलात फायटर पायलट होते. त्यांच्यामुळेच हवाई दलाबद्दल आकर्षण निर्माण झाल्याचे ओंकार म्हणतो. क्रिष्णा वर्पे हा अहमदनगर जिल्ह्य़ातील संगमनेरचा रहिवासी असून भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्य़ाद्री विद्यालयाचा विद्यार्थी आहे. क्रिष्णाची आई संगीता या संगमनेर कृषी विभागात कृषी अधिकारी म्हणून तर, वडील सुभाष वर्पे हे कणोली येथे शिक्षक आहेत. काका भागवत वर्पे हे भारतीय लष्करात तोफखाना विभागात हवालदार होते. त्यांच्यामुळेच या क्षेत्राकडे आकर्षित झाल्याचे त्याचे म्हणणे आहे.
शुभम वराडे हा पंचवटीतील चाणक्यपुरी हौसिंग सोसायटीचा रहिवासी असून कोपरगावच्या संजीवनी सैनिक स्कूलचा विद्यार्थी आहे. शुभमची आई भारती वराडे या गृहिणी असून वडील उत्तम वराडे हे दिंडोरीतील ननाशी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षक आहेत. राज्यस्तरावरील गणिताच्या स्पर्धा परीक्षांमध्येही त्याने विशेष प्रावीण्य मिळविले आहे. शुभमला एनडीएनंतर भारतीय हवाईदलात वैमानिक होण्याची इच्छा आहे. सुदर्शन अकादमीचे हर्षल आहेरराव यांनी यंदाच्या निवड प्रक्रियेमध्ये प्रचंड स्पर्धा होती असे नमूद केले. ज्या विद्यार्थ्यांना एनडीएमध्ये प्रवेश मिळविण्याची इच्छा आहे. त्यांनी अभ्यासाबरोबरच व्यक्तीमत्त्वाच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.