शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विकासासाठी पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३६ कोटीची यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली असून उर्वरित ८५ कोटीची सामुग्री हिंदुस्थान लाईफ केअर लि. या कंपनीमार्फत खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी सामंजस्य करार झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या माध्यमातून १५० कोटीपैकी ४० कोटीची निधी मिळाला. यातून ३६ कोटीची सामग्री खरेदी करण्यात आली. तर उर्वरित ४ कोटी रुपये कंपनीकडे वळते केले आहेत. राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात २५ कोटी मिळाल्यानंतर नुकतेच ८ कोटी रुपये मेडिकलला मिळाले असून ही रक्कम ट्रॉमा केअर युनिटसाठी खर्च करण्यात येणार आहे.
पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेतून जी उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत ती यापुढे हिंदुस्थान लाईफ केअर लि. करणार आहे. त्यासाठी डॉ. श्रीकांत मटकरी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. प्रदीप दीक्षित, डॉ. किशोर टावरी, डॉ. तिरपुडे, डॉ. सजल मित्रा यांच्यासह एकूण ७ सदस्य असलेली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती रुग्णालयातील विविध विभागांमध्ये लागणारी उपकरणाची यादी निश्चित करून ती कंपनीकडे देईल आणि कंपनी समितीमधील सदस्यांना सोबत घेऊन साधनांची खरेदी करणार आहे. मुंबई, त्रिवेंद्रम, वाराणसी, लखनऊ, बंगलोर, जम्मू-काश्मीर, कोलकता, रोहतक, अमृतसर आदी १६ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाची कामे या कंपनीमार्फत सुरू आहेत. रुग्णालयातील उपकरणे नादुरुस्त झाली तरी त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी किमान पाच वर्ष कंपनीकडे राहणार आहेत. ८५ कोटीपैकी ६० कोटीची साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी तर उर्वरित रक्कम ही बांधकामासाठी उपयोगात आणली जाईल. १२ कोटी ३५ लाख रुपये ट्रामा केअर युनिटसाठी तर १५ कोटी ८५ लाख सुपर स्पेशालिटी खर्च करण्यात येणार आहे. ट्रॉमा केअर युनिटमध्ये स्वतंत्र सीटी स्कॅनची सोय करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डॉ. पोवार यांनी सांगितले.  ट्रामा केअर युनिटचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी लागणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबतचा ४०० जागांचा प्रस्ताव फेब्रुवारी अखेपर्यंत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत त्यामुळे ट्रॉमा केअर युनिटसाठी स्वतंत्रपणे डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई असा ४०० जागेचा प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात वैद्यकीय संचालकांशी चर्चा करण्यात आली. डॉ. मटकरी यांच्या नेतृत्वाखालील समिती हा प्रस्ताव तयार करीत आहेत. ९० खाटांच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये अत्याधुनिक उपकरणे राहणार असून एकाच ठिकाणी रुग्णाला सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहेत. येत्या दीड ते दोन वर्षांत या युनिटचे काम पूर्ण होईल.