डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ३९ जणांना पीएच. डी. च्या मार्गदर्शक पदावरून अपात्र ठरविण्यात आले. ३९ पैकी २६ प्राध्यापकांची यादी शुक्रवारी राज्यपाल कार्यालयास कळविण्यात आली.
अधिसभा सदस्य संजय निंबाळकर यांनी या अनुषंगाने तक्रार केली होती. त्यानंतर डॉ. अशोक मोहेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने ५१ जण दोषी असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर केलेल्या तपासणीत पीएच. डी. च्या ११ मार्गदर्शकांना पात्र ठरवण्यात आले. मात्र, अपात्र ठरविलेल्या ३९ जणांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. करणाऱ्या ३१२ संशोधकांना नवीन मार्गदर्शक देण्याचे विद्यापीठासमोर आव्हान असेल.
विद्यापीठ प्रशासनाने या कारवाईस बरेच दिवस टाळाटाळ केल्याने कुलगुरूंसह प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह लावले जात होते. पीएच. डी. ला मार्गदर्शन करण्यास अपात्र असणाऱ्या ६५ जणांची यादी निंबाळकर यांनी विद्यापीठ प्रशासनास दिली होती. चौकशीनंतर ५१ जणांना दोषी ठरविले. मात्र, कारवाई काही होत नव्हती. ज्यांना दोषी ठरविले, त्यापैकी ३८ जणांनी ते कसे पात्र आहेत याचे पुरावे नव्याने विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. यातही छाननीनंतर २६ अपात्र पीएच. डी. मार्गदर्शकांची यादी तयार करण्यात आली. यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उल्हास शिंदे हे मार्गदर्शक समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी स्वत:लाच पीएच. डी. मार्गदर्शक म्हणून जाहीर केले होते.
दरम्यान, ही कारवाई केल्यानंतर अपात्र प्राध्यापकांची यादी संकेतस्थळावर टाकायची की नाही, या बाबतच्या सूचनांची प्रतीक्षा दिवसभर अधिकाऱ्यांनी केली. कारवाई झाली आहे, असे तोंडी सांगण्यात आले. मात्र, हे आदेश उशिरापर्यंत संकेतस्थळावर नव्हते. या अनुषंगाने तक्रार करणारे अधिसभा सदस्य संजय निंबाळकर म्हणाले की, हा सगळा प्रकार राजकीय दबावामुळे झाला आहे. अपात्र मार्गदर्शकांवर कारवाई झाली, पण ज्या समितीने मार्गदर्शक म्हणून त्यांची निवड केली, त्या समितीवर काय कारवाई होणार? एका पीएच. डी. मार्गदर्शकाकडे ८ विद्यार्थी संशोधन करीत असतात. ३९ जणांना अपात्र ठरवल्याने त्यांच्याकडे पीएच. डी. करणाऱ्या ३१२ विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या विद्यार्थ्यांना अन्य मार्गदर्शक दिले जातील, असे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी सांगितले. अपात्र असताना प्राध्यापकांच्या नियुक्त्या कशा झाल्या, असे प्रकार का होतात, यातील दोष शोधण्यासाठी समितीही स्थापन केली जाणार आहे.
अपात्र मार्गदर्शकांची नावे
मराठीचे मार्गदर्शक – डॉ. डी. पी. डुंबरे, डॉ. एच. टी. माने, डॉ. एस. एस. सरकटे; यांत्रिकी मार्गदर्शक – डॉ. प्रमोद ए. देशमुख, डॉ. प्रकाश गोपाळराव कदम, डॉ. सी. एल. गोगटे, डॉ. स्वरूप लाहोटी (औषधी निर्माणशास्त्र), डॉ. उल्हास बी. शिंदे (इलेक्ट्रॉनिक्स), डॉ. अर्चना जी. ठोसर (इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग); इंग्रजीचे मार्गदर्शक – डॉ. प्रज्ञा डी. देशपांडे, डॉ. एन. सी. देशमुख; वाणिज्य मार्गदर्शक – डॉ. नंदकुमार राठी, डॉ. एस. जे. भावसार, डॉ. महावीर एन. सदावर्ते, डॉ. एस. बी. चंदनशिवे, डॉ. माणिक साधू वाघमारे, डॉ. राजेश एस. िशदे, डॉ. विलास एस. ईप्पर, डॉ. राजेश बी. लहाने, डॉ. किशोर एल. साळवे, डॉ. रेणुका डी. बडवणे (समाजकार्य), डॉ. अशोक टी. गायकवाड (संगणकशास्त्र), डॉ. एस. एस. सोनवणे (ग्रंथालय माहितीशास्त्र), डॉ. नम्रता महेंद्रर (संगणकशास्त्र), डॉ. माधुरी एस. जोशी (संगणकशास्त्र व अभियांत्रिकी).