दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ४१४ कोटी रूपये खर्च केले आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल १३७ कोटी रूपये जनावरांच्या छावण्यांवर खर्च झाला आहे. यात चाऱ्याच्या खर्चाचा समावेश नाही.
पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी टंचाई निवारणाच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. माजी आमदार दादा कळमकर, प्रांताधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा पुर्नवसन अधिकारी गोरक्ष गाडीलकर, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जि. प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम यावेळी उपस्थित होते.
सध्या जिल्ह्य़ातील ३०४ गावे व १ हजार ४०८ वाडीवस्त्यांना ४४० टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यासाठी २३ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. चारा डेपोवर ९४ कोटी रूपये, प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरूस्तीसाठी ६ कोटी रूपये खर्च झाले आहे. रोजगार हमी योजनेतून १५० कोटी रूपयांची कामे आतापर्यंत झाली आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून ४ कोटी रूपये दुष्काळ निवारणासाठी मिळाले आहेत.
छावण्यांमध्ये २ लाखांच्या आसपास जनावरे आहेत. रोजगार हमी योजनेवर २१ हजारपेक्षा जास्त मजूर काम करत आहेत अशी माहिती पाचपुते यांनी दिली. जिल्हा प्रशासन दुष्काळाचा सामना व्यवस्थित करत असून लोकांना गावातून किंवा विभागातून स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही यासाठी प्रशासन सज्ज आहे असे ते म्हणाले.