राज्यातील २ हजार ४६८ धरणांमध्ये  ४८ टक्के पाणी साठा आहे. यामध्ये सर्वाधिक ७६ टक्के कोकण विभागात तर सर्वात कमी १७ टक्के पाणी साठा मराठवाडा विभागात आहे. नागपूर विभागात ५४ , अमरावती ५४, नाशिक ४० व पुणे विभागात ५२ टक्के पाणी साठा आहे. राज्यात टंचाई असलेल्या ९६९ गावांमध्ये १३८१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
राज्यातील टंचाईग्रस्त भागात ३९५ गुरांच्या छावण्या उघडण्यात आल्या असून त्यामध्ये साडेतीन लाख गुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरांच्या छावण्यांवर राज्य शासनाने आतापर्यंत २२३ कोटी ४ लाख रुपये खर्च केले असून चारा वितरणासाठी ६८४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्य़ात १७६, उस्मानाबाद २, पुणे १, सातारा ८९, सांगली २० आणि सोलापूर जिल्ह्य़ात १०९ छावण्या उघडण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत राज्यात १८ हजार ९०७ कामे सुरू असून या कामांवर १ लाख, ४८ हजार मजूर आहेत. २०१२-१३ वर्षांतील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली असून त्यात ७ हजार ६४ गावांतील पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आढळून आली आहे. रब्बी हंगामाच्या पैसेवारीत ३ हजार ५०९ गावांतील पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आढळून आली आहे.
नागपूर विभागातील १८ मोठय़ा प्रकल्पांमध्ये ५७ टक्के, ४० मध्यम प्रकल्पांमध्ये ४० टक्के तर ३१० लघु प्रकल्पांमध्ये ४० टक्के  पाणी साठा आहे. विभागात महाजनकोच्या इरई धरणात सर्वाधिक ८१ टक्के पाणी साठा तर सर्वात कमी नांद वणा धरणात ११ टक्के पाणी साठा आहे.  लोअर वर्धा टप्पा एकच्या सांडव्यातून २५ क्युमेक्स विसर्ग झाला आहे.