बॅनर काढण्यावरून दोन गटांत झालेल्या वादातून सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे निर्माण झालेले तणावाचे वातावरण कायम आहे. गावची बाजारपेठ सुरू व्हावी, यासाठी पोलीस विभागाने शांतता समिती बठक घेतली. मात्र, व्यापाऱ्यांनी चौथ्या दिवशी बाजारपेठ बंद ठेवली. दरम्यान, या प्रकरणातील १३ आरोपींपकी १२जणांना परभणी कारागृहात हलविले, तर एकाला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केले. गावात चोख बंदोबस्त आहे.
गेल्या शुक्रवारी गोरेगाव येथे संदल मिरवणूक व शुभेच्छा असलेले एमआयएमचे बॅनर काढण्यावरून एका गटाकडून दगडफेक झाली. दुसऱ्या गटाने बाजारपेठेत दगडफेक करून किरकोळ दुकानांना आग लावली. या प्रकारामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संग्राम सांगळे यांनी शुक्रवारी गावात शांतता समितीची बठक घेऊन तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणात १३ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता, एका गटातील सात जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी, तर दुसऱ्या गटातील सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
सोमवारी आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने १२ आरोपींची परभणी कारागृहात रवानगी झाली, तर एका आरोपीची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत रविवारी शांतता समितीची बठक झाली. मात्र, ग्रामस्थांनी त्याला दाद न देता सोमवारीही बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला.
दरम्यान, गोरेगाव येथे पत्रकारांना पोलिसांकडून झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ औंढा नागनाथ पत्रकार संघ, िहगोलीतील पत्रकारांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन पत्रकारांना संरक्षणाचा कायदा मंजूर करावा, अशी मागणी केली.