केंद्र सरकारने थेट पाच कोटी रुपयांची मदत करून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी औजारांचे प्रशिक्षण, तपासणी व उत्पादनाची सोय केली आहे. या माध्यमातून येत्या काही वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. कृषी विद्यापीठांना स्वयंपूर्ण करणे व शेतकऱ्यांच्या समस्या स्थानिक स्तरावर मार्गी लावण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाचा फायदा थेट शेतकऱ्यांना होईल.
आतापर्यंत देशात चारच ठिकाणी कृषी औजारांची तपासणी होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या औजारांची गुणवत्ता काय, याबाबतचा प्रश्न कायम राहत होता. शेतकऱ्यांना मिळणारी औजारे चांगल्या दर्जाची आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी थेट देशात विखुरलेल्या चार केंद्रांवर तपासणी करावी लागत होती. ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंर्तगत कृषी औजारांचे प्रशिक्षण, तपासणी व उत्पादन केंद्र कृषी विद्यापीठात उभारण्यात येत आहे. या केंद्राच्या इमारतीचे काम सुरू असून हे केंद्र यंदा डिसेंबर अखेपर्यंत शेतकरी व कृषी औजारांची निर्मिती करणाऱ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे, अशी माहिती कृषी शक्ती व औजार विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश ठाकरे यांनी दिली.
स्पेअर, पेरणीयंत्र, फवारणी यंत्र, अशा विविध कृषी उपयोगी वस्तूंची गुणवत्ता तपासणी या केंद्रात केली जाईल. या माध्यमातून कृषी उपकरणांची थेट शेतातील व प्रयोगशाळेतील तपासणी होणार आहे.
या तपासणी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यात मोठी मदत होईल. या टेस्टिंग सेंटरमध्ये कृषी औजारांची गुणवत्ता तपासली जाणार असल्याने त्या औजारांची कार्यक्षमता व ते किती दिवस शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरेल, याची माहिती उपलब्ध होईल.
तसेच खाजगी कृषी औजारांचे उत्पादकांना या केंद्रामुळे त्यांच्याद्वारे उत्पादित वस्तू योग्य गुणवत्तेची आहे की नाही, याची खातरजमा आता अकोल्यातच करता येईल, अशी माहिती या प्रकल्पाचे प्रमुख डॉ.शैलेश ठाकरे व मुख्य निरीक्षक डी.एस.कराळे यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2013 रोजी प्रकाशित
पंकृवित कृषी औजारांची होणार तपासणी केंद्र सरकारच्या मदतीने ५ कोटींचा प्रकल्प
केंद्र सरकारने थेट पाच कोटी रुपयांची मदत करून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी औजारांचे प्रशिक्षण, तपासणी व उत्पादनाची सोय केली आहे. या माध्यमातून येत्या काही वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे.
First published on: 20-01-2013 at 12:12 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 caror project of central government of agricultural equipment checking centre in pda college