राज्यात वेगळेपण आणि कमालीच्या यशस्वी ठरलेल्या महानगरपालिकेच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रातील पाच विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षकापदी निवड झाली आहे. केंद्राचे प्रकल्प संचालक प्रा. एन. बी. मिसाळ यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या या परीक्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात पाच विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यात चार मुलींचा समावेश आहे. पूनम आगरकर, जयश्री अनवणे, स्वाती साठे, सविता म्हस्के आणि संतोष म्हस्के हे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची या पदासाठी निवड झाली आहे. महापौर शीला शिंदे, मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी, उपमहापौर गीतांजली काळे व अन्य पादाधिका-यांनी हे गुणवंत व प्रा. मिसाळ यांचे अभिनंदन केले आहे.
स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालवणारी नगर ही राज्यातील एकमेव मनपा आहे. अन्य कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेत अशा स्वरूपाचा उपक्रम चालवला जात नाही. मागच्या काही वर्षांत या केंद्राला झळाळी प्राप्त झाली आहे. केंद्रासाठी अलीकडेच मनपाला जिल्हा नियोजन समितीतून खास बाब म्हणून सुमारे ८० लाख रुपयांचा निधी मिळाला असून त्यातून केंद्रासाठी सावेडी उपनगरात अद्ययावत इमारत बांधण्यात येणार आहे. भाजपचे गटनेते सचिन पारखी व विरोधी पक्षनेते विनित पाऊलबुद्धे यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला. नव्या इमारतीत सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, सभागृह व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यानंतर हे केंद्र अधिक सक्षमतेने हा उपक्रम राबवील असा विश्वास प्रा. मिसाळ यांनी व्यक्त केला.