तब्बल १२५ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नव्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतुकीचे नियंत्रण करण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा अद्ययावत वाहतूक नियंत्रण कक्ष सर्व सुविधांसह सेवेत येण्यासाठी मे महिना उजाडणार असला, तरीही या कक्षाच्या मदतीने दर तासाला तब्बल ५० विमानांची वाहतूक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून करण्याचा प्रयत्न आहे. सध्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दर तासाला ४२ विमानांची वाहतूक होते.
मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या कक्षाचा अडथळा विमानतळाच्या विस्तारीकरणात होत होता. मात्र आता हा नवीन वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आल्याने जुना कक्ष पाडण्यात येणार असून त्या जागी टॅक्सी बे बांधण्यात येणार असल्याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचे महाव्यवस्थापक हेमंत दासगुप्ता यांनी दिली.
या नव्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात मॉडेस्ट रडार बसवण्यात आले आहे. हे रडार येत्या दोन महिन्यांत कार्यान्वित होणार आहे. या रडारद्वारे विमानातील सर्व सेटिंग्ज नियंत्रण कक्षाला समजणार आहेत. त्याचप्रमाणे या कक्षात इलेक्ट्रॉनिक फ्लाइट प्रोग्रेस स्ट्रीपही उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे लेखी रेकॉर्ड ठेवण्याच्या कामापासून कर्मचाऱ्यांची सुटका होणार आहे. ही स्ट्रीपही मे महिन्यापर्यंत कार्यान्वित होणार आहे. नियंत्रण कक्षातून दिले गेलेले संदेश आणि वैमानिकासह झालेले संभाषण स्वयंचलित पद्धतीने ध्वनिमुद्रित होणार असून त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.
नव्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षात हवामान खात्याचा अंदाज थेट एका स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षाला वैमानिकांना योग्य सूचना देण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या कक्षाच्या हद्दीत ३५० किलोमीटर (२५० नॉटिकल किमी) एवढा परिसर आहे. या कक्षाची उंची ८३.८ मीटर आहे. या कक्षात एका पाळीत १० कर्मचारी आणि १२ अभियंते काम करू शकतील. नव्या वाहतूक नियंत्रण कक्षामुळे हवाई वाहतूक नियंत्रण कार्यक्षमतेत प्रचंड वाढ होणार असल्याने विमानतळावरून होणाऱ्या वाहतुकीचा वेगही वाढणार असल्याचे दासगुप्ता म्हणाले. सध्या कक्षाने दर तासाला ५० विमानांच्या वाहतुकीचे ध्येय समोर ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.